‘एचएमपीव्ही’(HMPV) विषाणूबाबत नाहक भीती बाळगू नये : सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश - जिल्हाधिकारी अकोला
शकील खान/अकोला :- एचएमपीव्ही विषाणूची नागरिकांनी नाहक भीती बाळगू नये. मात्र, आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे, जिल्ह्यात सर्दी- खोकला, सारी याबाबत गतिमान सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.
सध्या चीनमध्ये मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या आजाराचे रुग्ण वाढले, अशा बातम्या येत आहेत. हा आजार तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम 2001 मध्ये नेदरलँडमध्ये आढळला. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. त्यामुळे श्वसनमार्गाच्या वरील भागात (सर्दीसारखा) संसर्ग होतो. हा एक हंगामी स्वरूपाचा आजार आहे. तो सामान्यत: आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो.
खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने केल्या आहेत. त्याचे अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
खोकला येणे, ताप येणे, घसा खवखवणे, नाक वाहणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.
हे करा :- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यूपेपरने झाका.
- साबण आणि पाणी किंवा सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
- ताप,खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायूविजन ( व्हेंटिलेशन) होईल याची दक्षता घ्या.
हे करू नका :- हस्तांदोलन करु नये.
- टिश्यु पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नका.
- आजारी लोकांशी जवळचा संपर्क ठेवू नका.
- डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
- डॉक्टरांचे सल्ल्याशिवाय उपचार घेऊ नका.
या आजाराबाबत घाबरून न जाता आवश्यक काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.