पत्र्याच्या शेडमध्ये बनावट दारू बनवताना प्रौढाला अटक......
एलसीबीची कारवाई : दारू बनवणाऱ्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी
जळगाव : शहरातील नवल नगर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये देशी-विदेशी बनावट दारू तयार करणाऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री धाड टाकून मुसक्या आवळल्या आहेत. या कारवाईत ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दारू तयार करणाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे.
शिरसोली रस्त्यावरील नवलनगर भागात जितेंद्र वैद्यनाथ भाट हा त्याच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये देशी-विदेशी बनावट दारू तयार करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी मध्यरात्री १.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा मारत, जितेंद्र वैद्यनाथ भाट (वय ५५) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे देशी व विदेशी कंपनीच्या बनावट दारूचा साठा तसेच रसायन देखील आढळून आले. त्याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या कारवाईदरम्यान पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, राजेंद्र उगले, सहायक फौजदार अतुल वंजारी, राजेश मेढे, विजय पाटील, हरीलाल पाटील, प्रमोद ठाकूर, महिला पोलिस रूपाली खरे यांचा सहभाग होता.