
धोकादायकगौण खणिज उत्खनन प्रकरणी दोषीवर कारवाई करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी
खंडेराजूरी ( ता. मिरज) येथे महसुल विभागातील अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने लोकवस्तीजवळ विना परवाना सुरु असलेल्या स्टोन क्रशर व गौण खनिज उत्खननासाठी २० फुटापर्यंत सुरुंगाच्या होणाऱ्या वापराचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने विना परवाना सुरु असलेले स्टोन क्रशर तातडीने बंद करावे व धोकादायक गौण खणिज उत्खनन प्रकरणी दोषीवर कारवाई करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी विनोद कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
खंडेराजुरी येथे विनापरवाना असलेले स्टोन क्रशर व गौण खणिज उत्खननासाठी २० फुटापर्यंत बोअर मशीनच्या मदतीने सुरुंग उडविले जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची विनोद कोळी यांची तक्रार आहे. खंडेराजूरी येथे महसूल विभागाच्या आशिर्वादाने पाचशे मीटरवर कोळी यांची लोकवस्ती असताना गट नंबर ८५ मध्ये विना परवाना स्टोन क्रशर सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे धुलीकणाने शेती नापीक बनली आहे. द्राक्ष बाग तोडावी लागली. तसेच तेथेच जवळ गौण खणिज उत्खननासाठी बोअर मशीनचा २० फुटापर्यंत खोलवर वापर करुन सुरुंग उडविली गेल्याने बोअरचे पाणी गेले आहे. घरांचेही नुकसान होत असल्याची कोळी यांची तक्रार आहे.त्यांनी याबाबत तहसिलदारांकडे लेखी तक्रार देवूनही दखल घेतली नाही. मंडळ अधिकारी, तलाठी यांना या प्रकाराची माहीती असूनही डोळे झाक करीत असल्याने विना परवाना सुरु असलेले स्टोन क्रशर बंद करावे. आदेशाचा भंग करुन होणाऱ्या गौण खनिज उत्खननाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, एकरी ५ लाख रुपये वार्षिक नुकसान भरपाई देण्याची मागणी विनोद कोळी यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. येथे शासनाचा महसूल बुडवून होणाऱ्या उत्खनन घोटाळा प्रकरणी महसूलची झाडाझडती करण्याचीही कोळी यांची मागणी आहे.
गौण खनिज उत्खननाचा घोटाळा
खंडेराजूरी येथे गट नंबर १६७ मध्ये गौण खनिज उत्खननाचा परवाना असताना माफियांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन महाराष्ट्र शासनाच्या १६४ या गटात उत्खनन सुरु केल्याची कोळी यांची तक्रार आहे. पंचनाम्यास तलाठी आले मात्र ते पंचनामा न करताच परतल्याचीही कोळी यांची तक्रार आहे.