
अतिक्रमणाला विरोध केल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण, बेदम मारहाण
अहिल्यानगर: पारनेर शहरातील गणपती देवस्थान ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कायदेशीर संघर्ष करणारे ट्रस्टचे सदस्य व सामाजिक कार्यकर्त्याचे नगरसेवकासह इतर दहा ते बारा जणांनी अपहरण करून त्याला बेदम महारहाण करण्यात आली. गुरुवारी (दि.२६) सकाळी साडेआकरा वाजेच्या सुमारास पारनेर येथे ही घटना घडली.
या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात सुनील भाऊसाहेब चौधरी (वय ४१ रा.डिकसळ पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर नरगरपंचायतीचा नगरसेवक युवराज कुंडलिक पठारे, त्याचा भाऊ यशवंत उर्फ आबा कुंडलिक पठारे, बाळासाहेब पठारे, कुंडलिक पठारे, युवराज याची पत्नी (नाव माहित नाही) यांच्यासह इतर अनोळखी ७ ते ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरी हे जवळा येथील लोजागृती सामाजिक संस्थेत काम करत असून ते गणपती देवस्थान ट्रस्टचे सदस्यही आहेत. या ट्रस्टची सुमारे ३६ एकर जमीन पारनेर-सुपा रोडलगत एमएसईबीच्या पॉवर हाऊस जवळ आहे. त्या जागेत युवराज कुंडलिक पठारे, नामदेव पठारे, बाळासाहेब पठारे व इतर यांनी अतिक्रमण केलेले आहे. हे अतिक्रमण काढावे, यासाठी देवस्थानच्या ट्रस्टींनी औरंगाबाद खंडपिठात सन २०१८ मध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेचा निकाल होवुन अतिक्रमन काढण्यासाठी न्यायालयाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पारनेर नगरपंचायतकडे नोटीस पाठविल्या होत्या. अतिक्रमणधारकांना सात दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
नोटीस बजावल्यानंतरही अतिक्रमण न निघाल्याने चौधरी हे २६ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता रोजी ट्रस्टचे सचिव सुधीर देवीदास पाठक यांचे सांगण्यावरून नगरपंचायतमध्ये मुख्याधिकारी विनय शिपाई यांच्याशी अतिक्रमणाबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे युवराज कुंडलिक पठारे व आणखी दोन जण उपस्थित होते. याप्रसंगी पठारे याने मुख्याधिकारी यांच्यासमोरच चौधरी यांना दमदाटी करत जिवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांना नगर पंचायतीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोरच उचलून नेले. नगरपंचायतीसमोर असलेल्या काळ्या रंगाच्या थारमध्ये चौधरी यांना जबरदस्तीने बसवून पठारे याच्या घरी नेले. तेथे चौधरी यांना एका खोलीत कोंडून दोन तास सात ते आठ जणांनी बांबुच्या काठीने बेदम मारहाण केली.