logo

चांदसर हल्ल्याप्रकरणी आणखी एकास अटक....



चारही संशयिताना चार दिवसांची कोठडी
जळगाव/पाळधी : चांदसर येथे वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. दरम्यान, यापूर्वी गणेश विसर्जनाच्या दिवशी चांदसर येथील कोतवालाशी वाळूच्या विषयावरून वाद घातल्याने या संशयितांवर त्या वेळीही गुन्हे दाखल झाले होते.
महसूल कर्मचाऱ्यांवर हल्लाप्रकरणी पाळधी पोलिसांनी गुरुवारी आबा ईश्वर कोळी (३०), योगेश ईश्वर कोळी (२८) आणि
गणेश सोमा कोळी (३५) यांना अटक केली होती, तर रात्री दिनेश सोमा र कोळी यास अटक करण्यात आली.

धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर १४ ते १५ जणांनी हल्ला केला होता. यामध्ये तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर फावड्याने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

वरील चौघांना पाळधी पोलिसांनी धरणगाव येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेतील उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सपोनि प्रशांत कंडारे यांनी दिली.

गुन्हा आरोपींना दाखल झाल्यानंतर तात्काळ अटक करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व धरणगाव पोलिसांना दिल्या होत्या. गुन्ह्यात वापरलेले दोन ट्रॅक्टरही जप्त करण्यात आले आहेत.

*कराळे यांची भेट*

■ विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शुक्रवारी धरणगाव येथे पोलिस ठाण्यात भेट दिली आणि तपासाच्या दृष्टीने सूचनाही दिल्या.

41
3737 views