logo

तलाठ्यांचे काम बंद आंदोलन, १२४ मंडळातील कामकाज ठप्प....


जळगाव धरणगाव येथील ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्यावर वाळू माफियांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध करत जिल्ह्यातील १२४ मंडळातील ६५० अव्वल कारकून, तलाठी व मंडळाधिकाऱ्यांनी शुक्रवारीही काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे सर्वच मंडळातील कामकाज दुसऱ्या दिवशीही ठप्प झाले. या घटनेतील सर्वच आरोपींना अटक करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा तलाठी संघटनेने घेतला आहे.

दत्तात्रय पाटील हे गुरुवारी (दि.१९) पहाटे २ वाजता चांदसर बुद्रूक येथील गिरणा नदी पात्रात अवैध गौणखनिज वाहतूक प्रतिबंधक पथकासह सेवा बजावत होते. वाळू माफियांनी पाटील यांना फावडे व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

मारहाणीत पाटील यांच्या पायाचे हाड मोडले. या घटनेनंतर जिल्हा तलाठी संघाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सततच्या हल्ल्यांविषयी चिंता व्यक्त केली. त्यानंतर या घटनेतील सर्वच आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत 'काम बंद' आंदोलन करण्याचा निर्णय घेतला, यापुढे अवैध गौणखनिज प्रतिबंधक पथकाचे कामकाज कायमस्वरूपी नाकारत असल्याची भूमिका घेतली. त्यानुसार गुरुवारपासून आंदोलनाला सुरुवात झाली. शुक्रवारीही आंदोलन कायम होते.


*पायावर शस्त्रक्रिया*

दरम्यान, जखमी दत्तात्रय पाटील यांच्या पायाचे हाड मोडले आहे. गुरुवारी रात्री त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस त्यांना रुग्णालयातच थांबून राहावे लागणार आहे.

शुक्रवारीही आदोलन कायम होते. या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेनेही पाठिंबा दिला आहे. सर्वच आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची संघटनेची भूमिका आहे.

- *आर. डी. पाटील, जिल्हाध्यक्ष, तलाठी संघ*

*आयुक्तांकडून दखल*

चांदसरमधील घटनेनंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना विभागीय आयुक्तांनी कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून आढावा घेतला. तर पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेसह पाळधी पोलिसांना अटकसत्र राबविण्याचे आदेश दिले. शुक्रवारपर्यंत चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यातील २ ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत. आबा ईश्वर कोळी, योगेश ईश्वर कोळी, दिनेश सोमा कोळी, गणेश सोमा कोळी असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.


*७ जणांची नावे निष्पन्न*

दरम्यान, हल्लेखोरांच्या जमावातील ७ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यानुसार शुक्रवारी सकाळी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

49
1912 views