नांदेडला मिळणार ६३ ई-शिवाई बसेस
विभाग नियंत्रक डा. चंद्रकांत वडस्कर यांची माहिती
नांदेड, दि.२० ः नांदेड विभागाला लवकरच ई-शिवाई वातानुकुलीत ६३ बसेस मिळतील, अशी माहिती विभाग नियंत्रक डाॅ. चंद्रकांत वडस्कर यांनी दिली.
ई-शिवाई बसेस प्रदूषणमुक्त प्रवास आणि इंधनावर होणारा खर्च कमी करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची विजेवर धावणारी पहिली वातानुकूलित ई-शिवाई बस अजूनही नांदेड विभागाला प्राप्त झालेली नाही. पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई तथा सोलापूर आदी मार्गावर शिवाई बसेस सुरु झाल्या आहेत. मात्र, नांदेड जिल्हा अजूनही ई-शिवाई बसच्या प्रतिक्षेत होता. दिल्ली सरकारच्या ई-बसला उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर राज्यात महामंडळाने ही बससेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात पाच हजारांवर शिवाई बसेस लवकरच दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील काही आगारांत ही बससेवा सुरु करण्यात आली. नांदेड आगारालाही लवकरच ई-शिवाई बसेस मिळणार असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनाही शिवाई बसमधून प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
जीपीएसयुक्त ही बस १२ मीटर लांब आहे. शिवाईमध्ये एकाच वेळेच ४३ प्रवासी प्रवास करू शकतात. बसची रंगसंगती ही आकर्षक असून, आवाज विरहित आहे. शिवाई या बसमध्ये अपंगांसाठी वेगळा रॅम्प आहे. सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही व सुरक्षेच्या अन्य सुविधाही उपलब्ध आहेत. याशिवाय मोबाइल चार्जिंग पोर्ट, डाल्बी साउंड, पुश बॅक बकेट सीट, पुढील व मागील बाजूस मराठी व इंग्रजीमधून मार्ग फलक, रीडिंग लॅपची सुविधा, प्रवाशांसाठी इमर्जन्सी पॅनिक बटन, एलईडी फुट लॅंप, इनसाईड लगेज रॅक, बसच्या बाहेरील बाजूस मोठ्या बॅगसाठी प्रशस्त डिक्की, इमर्जन्सी हॅमर, प्रवाशांच्या माहितीसाठी चालकाला केबिनमधून प्रवाशांना आवश्यक सूचना देण्यासाठी अनाऊन्समेंट सिस्टीमचीही सुविधा असणार आहे.
--------------कोट--------------
प्रत्येक आगारात सात याप्रमाणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६३ ई-शिवाई बसेस उपलब्ध होणार आहेत. मात्र, अजून बसेस दाखल झालेल्या नाहीत. लवकरच या बसेस उपलब्ध होतील.
डाॅ. चंद्रकांत वडस्कर, विभाग नियंत्रक नांदेड