logo

वाशीमवासियांचा यल्गार “अबकी बार, टी.बी. हद्दपार” ‘या निर्णायक लढाईत सर्वांनी सहभागी व्हावे’ : केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन



जिमाका, वाशीम (दि.०७): आजपासून देशभरातील ३४७ जिल्ह्यांमध्ये क्षयरोग (टी.बी.) निर्मुलांच्या दृष्टीने एक प्रयत्न म्हणून १०० दिवशीय अभियानाची सुरुवात होत आहे. देशभरातून या कार्यक्रमाचा शुभारंभ हरियाणातून केंद्रीय आरोग्य मंत्री श्री.जगत प्रकाश नड्डा यांचे हस्ते झाला; तर महाराष्ट्र राज्यातून या कार्यक्रमाचा शुभारंभ वाशीम जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनातील हॉलमध्ये भारत सरकारचे आरोग्य कुटंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष विभागाचा स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय राज्यमंत्री मा.श्री.प्रतापराव जाधव यांचे हस्ते झाले. त्याचे थेट प्रक्षेपण संपूर्ण राज्यात दाखविण्यात आले. यावेळी बोलताना केद्रीय राज्यमंत्री यांनी ‘आजपासून सुरु होणार्या व पुढील १०० दिवस चालू राहणाऱ्या टी.बी.मुक्त भारत अभियानास सर्वांनी सहकार्य करावे. तसेच या निर्णायक लढाईत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
तसेच पुढे जनतेला संबोधित करताना त्यांनी सांगितले की, देशाने उच्च दर्जाच्या निदान यंत्रांची संख्या वाढवली असून, 2014-15 मध्ये काही शेकड्यांवर असलेली निदान यंत्रांची संख्या आज सुमारे 8000 वर पोहोचली आहे, ज्यामुळे देशभरातील बहुतेक तालुक्यामध्ये त्यांची उपलब्धता सुनिश्चित झाली आहे. महाराष्ट्रात अशा 795 मशीन आहेत, ज्यामुळे राज्यातील बहुतेक तालुक्यांमध्ये क्षयरोगाचे परीक्षण करणे शक्य झाले आहे. वाशिम जिल्ह्यात अशा 9 मशीन कार्यरत आहेत. देशभरात या कार्यक्रमाद्वारे उच्च गुणवत्तापूर्ण औषधे पुरविण्यात येत आहे. ही औषधे खासगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांतील रुग्णांसाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. MDR-TB च्या उपचारांसाठी, ज्यामध्ये मृत्यू दर खूप जास्त आहे, त्यामध्ये कार्यक्रमाने BPaLM नावाच्या नवीन उपचार पद्धतीची सुरुवात केली आहे. ही फक्त सहा महिन्यांची उपचार पद्धत असून याची यशस्वितेचा दर खूप जास्त आहे आणि यात फक्त चार औषधांचा समावेश आहे. पूर्वीच्या पद्धती कमी प्रभावी होत्या, त्यात औषधांची संख्या जास्त होती आणि उपचारांचा कालावधी दोन वर्षांपेक्षा अधिक होता.
आयुष्मान भारत उपक्रमांतर्गत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) क्षयरोग रुग्णांना माध्यमिक व तृतीय स्तरावरील विशेष उपचार पुरवत आहे. याशिवाय, 1.6 लाखांहून अधिक आरोग्य आणि कल्याण केंद्रे (HWC), ज्यांना आयुष्मान आरोग्य मंदिर (AAM) असेही म्हणतात, जे कि, लोकांच्या घराजवळ आवश्यक प्राथमिक आरोग्य सेवा पोहोचवत आहेत. PM-JAY आणि HWC आणि AAM द्वारे दिल्या जाणाऱ्या विकेंद्रित टीबी सेवांमुळे आपण आरोग्यसेवा सर्वांसाठी, विशेषतः सर्वांत दुर्बल लोकसंख्येसाठी सुलभ, परवडणारी आणि न्याय्य करण्याच्या बांधिलकीस बळकट करत आहोत.
सन २०१५ पासून, भारताने टी.बी.च्या रुग्णामध्ये तब्बल १७.७% इतकी घट साधली आहे. विशेषतः क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये आणि मृत्यूदरामध्ये भारताची घरारण हि जागतिक सरासरीच्या दुप्पट आहे. ही बाब नक्कीच वाखान्याजोगी आहे. क्षयरोग ही केवळ वैद्यकीय समस्या नाही तर ती एक गंभीर सामाजिक समस्या आहे. यामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांवर सामाजिक कलंक व भेदभावाचा खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याविषयी अधिक जनजागृती होवून क्षयरुग्णांना समानतेची भेदभावरहित वागणूक मिळणे अगराजेचे आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रित येवून टी.बी.विरुद्धच्या या लढाईत आपण सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.
“आरोग्य विभागाने सर्वच आरोग्य विषयक कामांमध्ये महाराष्ट्रात अग्रेसर राहून आली क्षमता सिद्ध केली आहे. मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच ५० खाटांचे आयुर्वेदिक रुग्णालय मंजूर करत असल्याबद्दल जिल्हा परिषद वाशीमचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत ठाकरे यांनी श्री.प्रतापराव जाधव यांचे आभार व्यक्त केले तसेच रिक्त पदांची व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी विशेष मंजुरी मिळावी हि विनंती देखील यावेळी त्यांनी केली.
कार्यक्रमावेळी झालेल्या भाषणामध्ये बोलताना जिल्हा परिषद वाशीमचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती श्री. चक्रधर गोटे यांनी सांगितले कि, पूर्वी टी.बी.चा रोग व रोगी लपविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत होते. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता लोक स्वतःहून थुंकी तपासून घेण्यासाठी येत आहेत. आरोग्य विभागामार्फत घरोघरी जावून लोकांचे समुपदेशन केले जात आहे. केंद्र शासनाने आकांक्षित जिल्ह्याचा कलंक पुसून टाकण्यासाठी भरघोस मदत करावी. या जिल्ह्याचा मागासलेपणा घालवावा. या जिल्ह्याला ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करून द्यावे. जास्तीच्या एक्स-रे व्हॅन उपलब्ध करून द्याव्यात. सध्या कार्यरत असणाऱ्या आयुर्वेदिक दवाखान्याचे रुपांतर प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हावे. जिल्हा स्त्री रुग्णालयास सुसज्ज आयसीयु मिळावा. अशा मागण्या यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांना केल्या.

या मोहीमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरोग रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे, क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, क्षयरोगाविषयी समाजातील भीती, अनिष्ट रूढी परंपरा, भेदभावाची वागणूक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, निक्षयमित्र यांचेकडून पोषण आहार कीटचे वाटप करणे असा आहे. या मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणी करीता तसेच १०० दिवशीय क्षयरोग मुक्त भारत मोहीमेमध्ये सर्वांनी सक्रीय सहभाग घेवून जिल्हा क्षयरोग मुक्त होईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन भारत सरकारच्या सेन्ट्रल टीबी डिव्हिजनचे सहआयुक्त डॉ. संजयकुमार मट्टू यांनी केले.
ही मोहीमेमध्ये देशभरातील निवडलेल्या 347 जिल्ह्यांमध्ये तर त्यामधील राज्यातील १७ जिल्हे आणि मुंबईसह एकूण १३ महानगरपालिकामध्ये राबविण्यात येत असून यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश करणेत आला आहे. यामध्ये स्थलांतरीत, ऊस तोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यासारखे जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, नि-क्षय शिबीर, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, औद्योगिक संस्था, निवासी शाळा, कारागृह, इ.ठिकाणी क्षयरोग तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. याकरिता जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियोजन केले आहे. सदर मोहीम राबविणे करीता सन्माननिय लोकप्रतिनिधी/सामाजीक संस्था/सामाजीक कार्यकर्ते व इतर विभाग यांचा सहभाग घेवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.तसेच या मोहिमेचाच एक भाग प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून प्रौढ बी.सी.जी. लसीकरण मोहीमेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून त्यामध्ये कोमॉर्बीड रुग्ण, रोगप्रतिकारक शक्ती कमी असेलेल्या व्यक्ती, धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती, ६० वर्षावरील सर्व व्यक्ती यांना त्यांचे संमतीने प्रौढ बी.सी.जी. लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच पल्मोनरी क्षयरुग्णांच्या संपर्कातील पात्र व्यक्तींची सी.वाय.टीबी (CY -TB) तपासणी करून त्यात पॉझिटिव्ह येणा-या व्यक्तींना टीपीटी चालू करण्यात येणार असल्याचे प्रास्ताविक यावेळी पुणेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक (क्षयरोग व कुष्ठरोग) डॉ. संदीप सांगळे यांनी सदर केले.
या कार्यक्रमामध्ये क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासठी निक्षय मित्र म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी डॉ.दीपक ठोके, डॉ.सुरेश गोरे, डॉ.महेश चव्हाण, श्री.दिघे तसेच संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे १०० टक्के प्रौढ बी.सी.जी. लसीकरण करवून घेतल्याबद्दल वडजी ग्रामपंचायतचे सरपंच डॉ.शत्रुघ्न बाजड तसेच टी.बी.मुक्त ग्रामपंचायत देपूळचे सरपंच डॉ.प्रमोद गंगावणे यांचादेखील सत्कार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचे मार्फत करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद वाशीमचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषद वाशीमचे उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती श्री. चक्रधर गोटे उपस्थित होते. तर हा कार्यक्रम भारत सरकारच्या सेन्ट्रल टीबी डिव्हिजनचे सहआयुक्त डॉ. संजयकुमार मट्टू, वाशीमच्या जिल्हाधिकारी श्रीम. भुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वैभव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री.म्हैसेकर, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक अमगोधू श्री रंगा नायक, मुंबईच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, पुणेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक (क्षयरोग व कुष्ठरोग) डॉ. संदीप सांगळे, आरोग्य सेवेच्या अकोला मंडळाचे उपसंचालक डॉ. कमलेश भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.श्वेता मोरवाल ठाकूर व राहुल कासदे यांनी केले. हा शुभारंभ कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ..अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.ठोंबरे, जिल्हा क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश परभनकर यांनी अहोरात्र मेहनत केली. या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचारी यांना लॅपटॉप वितरीत करण्यात आला. तसेच नवीन एक्सरे वाहनाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर श्री. समाधान लोनसुने यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाची सांगता क्षयरोग मुक्त भारतासाठी योगदान देण्याची शपथ घेवून करण्यात आली.

0
1758 views