logo

कल्याणमध्ये व्हर्टेक्स गृहसंकुलाच्या पंधराव्या, सोळाव्या माळ्याला भीषण आग

कल्याण: येथील पश्चिमेतील आधारवाडी भागातील व्हर्टेक्स हाऊसिंग सोसायटीतील पंधराव्या माळ्यावरील सदनिकेला मंगळवारी संध्याकाळी भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. आगीमुळे पंधराव्या, सोळाव्या माळ्यावरील काही सदनिका खाक झाल्या. लगतच्या चौदाव्या माळ्यावरील सदनिकांनाही आगीची झळ बसली.

कल्याण डोंबिवली पालिका अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु, अतिशय उंचावर लागलेली आग, तेथपर्यंत उच्चदाबाने पाणी मारण्यात जवानांना अनेक अडथळे येत होते. मध्यमवर्गियांची वस्ती म्हणून व्हर्टेक्स गृहसंकुल ओळखले जाते. मंगळवारी संध्याकाळी या संकुलाच्या पंधराव्या माळ्यावरील सदनिकेला आग लागली. शहराबाहेर हे संकुल असल्याने वाऱ्याच्या वेगाने आग भडकत गेली. पंधराव्या माळ्यावरील आग सोळाव्या माळ्यापर्यंत पोहचली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझविण्याचे काम सुरू असताना काही घरातील गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. आग लागलेल्या इमारतीमधील रहिवाशांनी उद्वाहन, जिन्याने जमिनीवर येणे पसंत केले.

आग सोळाव्या माळ्यापर्यंत पोहचली. तेथेपर्यंत उच्चतम दाबाने पाणी मारा करणारे कडोंमपाचे वाहन तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याने ठाणे महापालिका, बदलापूर नगरपालिकेची अत्याधुनिक यंत्रणेची अग्निशमन वाहने पाचारण करण्यात आली. घटनास्थळी पाच अग्निशमन विभागाचे पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका सज्ज होत्या. आगीत जीवित हानी झाली आहे का, कोणी अडकले आहे का हे पाहण्यासाठी पालिका, पोलिसांकडून ड्रोनचा वापर करण्यात आला. आगीत जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. वित्त हानी अधिक प्रमाणात झाली आहे. आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्यासह इतर पालिका अधिकारी घटनास्थळी हजर होते. वीस माळ्याहून अधिक मजल्यांवर आग लागली तर ती आग विझविण्यासाठी ७० मीटर हायड्रोलिक वाहन खरेदी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे आयुक्त डाॅ. जाखड यांनी सांगितले. इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसविल्यानंतर त्याची वेळच्या वेळी सोसायट्यांकडून देखभाल केली जात नाही. सदनिका सजावटीच्या नावाखाली ही यंत्रणा घर सजावट काराकडून झाकली जाते. त्यामुळे आग लागल्यानंतर ही यंत्रणा जवानांना लवकर सापडत नसल्याच्या तक्रारी उपस्थितांनी केल्या.
आग कशामुळे लागली हे निश्चित नसले तरी शाॅर्ट सर्किटमुळेच आग लागली असण्याची शक्यता अग्निशमन यंत्रणांनी व्यक्त केली.

0
2 views