logo

निवडणूक कर्तव्यात कसूर खपवून घेणार नाही - भरारी पथकात अनुपस्थित कर्मचारी निलंबित

शकील खान/अकोला -: निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर नसल्याचे आढळून आल्याने मंडळ अधिकारी व तलाठी अशा दोन कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज निर्गमित केला. निवडणूकीचे गांभीर्य ओळखून सर्व जबाबदार यंत्रणांनी काम करावे. निवडणूक कर्तव्यात एकही कसूर खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दिला आहे.
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्र. 1 चे पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी महादेव सरप आणि पथकातील सदस्य जीवन राठोड यांनी कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा व कसूर केली व सचोटी राखली नाही. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 नियम 3 मधील तरतुदीचा भंग झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
पथकप्रमुख मंडळ अधिकारी श्री. सरप हे निर्धारित वेळेत कर्तव्यावर हजर राहत नसल्याबाबत वृत्त एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्यावरून त्यांना मूर्तिजापूर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिका-यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली व खुलासा मागवून चौकशीही करण्यात आली. श्री. सरप हे निर्धारित वेळेत नसल्याचे दिसून आले. श्री. सरप यांनी स्वत: उपस्थित राहण्यासह पथकाच्या सर्व सदस्यांना उपस्थित ठेवणे व दिलेल्या कालावधीत गस्त घालणे अपेक्षित होते. तथापि, ते रात्री 1 ते 3 दरम्यान अनुपस्थित होते.
त्याचप्रमाणे, तलाठी जीवन राठोड हेही रात्री 12.30 वा. नंतर पथकासोबत नव्हते. जर पथकप्रमुख गैरहजर असतील तर त्याबाबत सदस्याने आचारसंहिता नोडल अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिका-यांना कल्पना देणे आवश्यक होते. दोन्ही कर्मचा-यांनी कर्तव्य न पाळल्यामुळे श्री. सरप व श्री. राठोड या दोघांनाही महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या नियम 4 अन्वये निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन कालावधीत दोघांचेही मुख्यालय अकोला तहसील कार्यालय राहील. कार्यालयप्रमुखाच्या परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. मुख्यालयी राहण्यास कसूर केली तर त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद आहे.
जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात निवडणूक यंत्रणा, पथके, अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणुकीचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडताना निवडणूक आयोगाने घालून दिलेले नियम व सूचनांचे काटेकोर पालन व्हावे. कर्तव्यात कुठेही हयगय केल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला आहे.

112
6743 views