हिंदू धर्मात तुळशी विवाह का केला जातो.?
पौराणिक कथा काय आहे आपण जाणून घेऊया.
मुंबई : हिंदू धर्मात तुळशी चे लग्न ह्या धार्मिक विधीला फार महत्त्व आहे. धार्मिक मान्यतांनुसार, भगवान शालिग्राम आणि माता तुळशीशी विवाह केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते.
ह्याबद्दल पौराणिक कथा काय सांगते थोडं समजून घेऊया.
जालंदर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता. त्याचा विवाह वृंदा नावाच्या मुलीशी झाला होता. वृंदा ही भगवान विष्णूची मोठी भक्त होती आणि तिच्या पतीसोबत एकनिष्ठ होती. त्यामुळे तिचा पती जालंधर अजिंक्य झाला.
मात्र, यानंतर जालंधरला अजिंक्य असल्याचा अभिमान वाटू लागला. तो स्वर्गातील मुलींना त्रास देऊ लागला. दुःखी होऊन सर्व देवांनी भगवान विष्णूचा आश्रय घेतला. जालंधरची दहशत संपवण्यासाठी प्रार्थना करू लागले.
तेव्हा विष्णूने जालंधराचे रूप धारण केले आणि वृंदाचा पतिव्रता धर्म नष्ट केला. त्यामुळे जालंधरची शक्ती कमकुवत झाली आणि युद्धात त्याचा मृत्यू झाला.
ही गोष्ट वृंदाला कळाली, तेव्हा तिने भगवान विष्णुला दगड बनण्याचा शाप दिला. मात्र, त्यानंतर इतर देवांनी वृंदाकडे शाप मागे घेण्याची विनंती केली. परंतु, वृंदाबाबत जे काही घडले, त्याचे भगवान विष्णुला वाईट वाटले. त्यांनी वृंदाचा शाप जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःला दगडाच्या रूपात प्रकट केले, ज्याला शालिग्राम असे म्हणतात.
भगवान विष्णूंनी दिलेला शाप परत घेतल्यानंतर वृंदा जालंधरसोबत सती गेली. वृंदाच्या राखेतून तुळशीचे रोप उगवले. वृंदाची प्रतिष्ठा आणि पवित्रता राखण्यासाठी देवतांनी शालिग्राम आणि तुळशीचे लग्न लावले.
त्यादिवशी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी होती, ज्या एकादशीला प्रबोधनी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते.
भगवान विष्णूने वृंदाला सांगितले की, "तू पुढील जन्मात तुळशीच्या रूपात प्रकट होशील आणि मला लक्ष्मीपेक्षाही प्रिय असेल. तुझे स्थान माझ्या मस्तकावर असेल. तुझ्याशिवाय मी खाणार नाही", अशी कथा आहे. यामुळेच भगवान विष्णूच्या प्रसादात तुळशीला नक्कीच ठेवले जाते. तुळशीशिवाय दिलेला प्रसाद भगवान विष्णू स्वीकारत नाहीत.