logo

बऱ्हाणपुर - तवा रस्त्याची खराब अवस्थेमुळे नागरिक हैराण- प्रशासनाचे दुर्लक्ष.


पालघर - बऱ्हाणपूर ते तवा हा रस्ता गेल्या काही वर्षांपासून दैनिय अवस्थेत आहे. पाच किलोमीटरचा हा रस्ता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडतो, त्यामुळे दररोज अनेक प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. जवळच असलेल्या कासा, चारोटी, डहाणू, आणि मनोर या प्रमुख बाजारपेठांमध्येही याच रस्त्याचा वापर होत असल्याने नागरिकांची या मार्गावर सतत वर्दळ असते. मात्र, या रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे आणि बाहेर आलेल्या खड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून या रस्त्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांत पाणी साचून त्यात लहानमोठे अपघात घडत असतात. बऱ्हाणपूर गावातील नागरिक जेव्हा कासा व तवा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी जातात, तेव्हा खराब रस्त्यामुळे अनेकदा वेळेत पोहोचता येत नाही. काही वेळा तर रस्त्यातच गरोदर महिलांची प्रसूती झाली आहे, आणि काही रुग्णांनी वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमावला आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव सहन करावा लागत आहे. नेते मंडळी केवळ निवडणुकीच्या वेळी मोठ्या घोषणा करतात, पण प्रत्यक्षात त्या घोषणांचे पालन होत नाही. नागरिकांचे जीवन अधिकाधिक अवघड होत चालले आहे, आणि त्यामुळे गावातील नागरिक आता प्रशासनाला विनंती करत आहेत की त्यांनी लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे.
नागरिकांची प्रशासनाला मागणी: तवा ग्रामपंचायत व बऱ्हाणपूर ग्रामपंचायत गावातील नागरिकांची अपेक्षा आहे की प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी. ग्रामीण भागातील या रस्त्याची समस्या सोडवून नागरिकांना सुरक्षित आणि सुयोग्य प्रवासाची सुविधा मिळावी, अशी त्यांची आर्त मागणी आहे.

54
2344 views