logo

इंद्रधनुष्य 2024 युवक महोत्सवात दोन सुवर्णपदके व एक रजत पदक मिळविलेल्या विजेत्यांचा कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्याकडून एक लाख रूपये बक्षिस घोषित करून गौरव

राहुरी विद्यापीठ, दि. 13 नोव्हेंबर, 2024
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शन व पाठींब्यातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे दि. 7 ते 11 नोव्हेंबर, 2024 या दरम्यान पार पडलेल्या राजभवन मुंबई संकल्पित इंद्रधनुष्य 2024 या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवक महोत्सवात महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संघाला दोन सुवर्णपदके व एक रजतपदक मिळाले आहे. या स्पर्धेमध्ये कृषि व अकृषि असे एकुण 24 विद्यापीठातील संघातून 19 वर्षात प्रथमच चारही कृषि विद्यापीठामधून गोदा या एकांकिकेस सांघिक सुवर्णपदक मिळाले. वैयक्तिक स्पर्धैत पाश्चिमात्य एकल गायनात तेजस कांबळे यास सुवर्णपदक तर क्षितीज जाधव यास ऑन दि स्पॉट फोटोग्राफीमध्ये रजतपदक असे तीन बक्षिसे जाहीर झाल्याने कुलगुरू डॉ पी.जी. पाटील यांनी सर्व विजेत्या व या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या 45 कलाकार विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पदव्युत्तर महाविद्यालयाच्या दृक श्राव्य सभागृहात इंद्रधनुष्यांच्या विद्यापीठ संघातील विजेत्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन व गौरव सोहळा कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी आयोजित केला होता. याप्रसंगी त्यांनी सर्व विजेत्यांना एक लाख रूपयांचे व एकांकिचे दिग्दर्शक मुंबई येथील अॅड. सागर गावंड व संगीत दिग्दर्शक कोल्हापूर येथील श्री. ॠतीराज रास्ते यांना प्रत्येकी 10 हजाराचे बक्षिस जाहीर केले. या छोटेखानी सत्कारात कुलगूरू डॉ. पाटील यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचा व दिग्दर्शकांचा गुलाबपुष्प देऊन गौरव केला.
यावेळी आपल्या मार्गदर्शनामध्ये डॉ. पी.जी. पाटील म्हणाले की कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधनातून सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खूपच कमी वेळ मिळतो. अकृषि विद्यापीठांच्या तुलनेत कृषि विद्यापीठामध्ये नाट्य, संगित, ललित कला व इतर सांस्कृतिक कलाप्रकारासाठी तज्ञ मार्गदर्शक व स्वतंत्र विभाग नसतात. तरीही त्यावर मात करून विद्यार्थी कष्ट घेऊन राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवतात हे निव्वळ स्वकष्टामुळेच शक्य होते. याप्रसंगी डॉ. पाटील यांनी डॉ. महावीरसिंग चौहान यांच्या अथक परिश्रमातून व मार्गदर्शनामुळे विद्यापीठाला सतत सहाव्या वर्षी इंद्रधनुष्यासह कला, क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळत असल्याचे सांगितले. त्याचेच एक फलित म्हणून सन 2023 या वर्षाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार व सर्वोत्कृष्ट संचालक म्हणून डॉ. महावीरसिंग चौहान यांना मिळाल्याबद्दल गौरवोद्गार काढले. याप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्षनाथ ससाणे, कुलसचिव डॉ. मुकूंद शिंदे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले. डॉ. महावीरसिंग चौहान यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. यात डॉ. भिमराव कांबळे, डॉ. विलास वाणी, डॉ अण्णासाहेब नवले, डॉ. बी.टी. पाटील, डॉ. पवन कुलवाल, डॉ. उल्हास सुर्वै, डॉ. सुनिल भणगे, डॉ. गेठे, दापोली कृषि विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. माने व श्री. किरण शेळके उपस्थित होते.

0
1315 views