logo

श्री विजय पांढरे याचे अध्यात्मा बद्दल चे परखड विचार...

रामदास ढोरमले
श्री विजय पांढरे याचे अध्यात्मा बद्दल परखड विचार.....
अध्यात्मावविषयी आजच्या घडीला जर आपण अंतर्मुख होऊन विचार करू लागलो तर असे आढळून येईल की आज खऱ्या अध्यात्माचा लोप होऊन एक बेगडी अध्यात्म, अध्यात्माच्या नावाखाली जगात विविध संप्रदायांचे, धर्मांचे, पंथांचे लेबल लावून जगात पसरले आहे. खऱ्या अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करणारे आत्मज्ञानी गुरू आज क्वचितच दिसतात. ते नाहीत असेही नाही. खऱ्या चलनाच्या अस्तित्वबरोबर जसे खोटे चलनही बाजारात येते, तसे या खऱ्या आत्मज्ञानी गुरूंच्या असण्यामुळे आज ढोंगी धर्मगुरूंनाही महत्त्व आल्याचे दिसते. हे ढोंगी धर्मगुरू, सामान्य संसारी मनुष्य जो अज्ञानी मूढ असतो, बेहोशीत जगत असतो, त्याला बेहोशीत ठेवतच त्याचे अव्याहत शोषण करत असतात. याचे कारण हे ढोंगी गुरूही त्या सामान्य माणसाइतकेच अज्ञानी व बेहोशीत असतात. खऱ्या अर्थाने त्यांना आत्मज्ञान झाले नसल्याने ते इतरांना शब्दांच्या जाळ्यात अडकवून व भीती दाखवून साळसूदपणे शोषण करून आपल्या तुंबड्या भरतात. ढोंगी गुरूंची ही अवस्था असेल तर त्यांच्या अनुयायांना कसे बरे आत्मज्ञान प्राप्त होणार? म्हणूनच अध्यात्माच्या क्षेत्रात आज आंधळ्यांचा बाजार भरला आहे, हेच सत्य आहे. खरे तर अध्यात्म ही अत्यंत साधी आणि सोपी गोष्ट आहे. अध्यात्म अजिबात कठीण गोष्ट नाही. पण अहंकाराचे, जिवाभावाचे, ‘मी’पणाचे, मनाचे, संस्कारांचे विसर्जन तशी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खऱ्या आत्मज्ञानी संतांचेच मार्गदर्शन गरजेचे आहे. आपल्या भारतात तर अशा आत्मज्ञानी संतांची अखंड परंपरा आहे. पण त्यांच्या उपदेशांचा अर्थ समजावून देणारे आत्मज्ञानी गुरू आज दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे त्यांचा वारसा आमच्या हाती ग्रंथरूपाने असूनही त्यांच्या ख‍ऱ्या अर्थाला आम्ही कधीच प्राप्त होत नाही; कारण ग्रंथात जे रहस्य लपले आहे ते केवळ ग्रंथ वाचून, पारायण करून किंवा प्रवचने ऐकून ते रहस्य आपल्याला प्राप्त होत नसते. त्यासाठी आपल्या अहंकाराचे, ‘मी’पणाचे, तसेच विविध संस्कारांचे विसर्जन होणे गरजेचे असते. त्या‌शिवाय सत्याचे कधीच आकलन होत नाही. आज आपण माहीतीला ज्ञान समजतो आहोत. वास्तविक इतकी दुर्दैवाची परिस्थिती भारतात कधीच नव्हती. आज आत्मज्ञानी गुरूंचे गुरूकुल नष्ट झाले आहे. आज सर्वत्र तमोगुणाचे प्राबल्य झाले आहे, रजोगुणाचेही मोठ्या प्रमाणात संवर्धन झाले आहे, तर सत्वगुण बिचारा अत्यंत कृश आणि अशक्त झाला आहे. शांती, समाधान, सुख, प्रज्ञा तर केवळ सत्वगुणाचाच परिपाक असतात. तुम्ही जर सत्वगुणी नसाल तर तुम्हाला कधीही खरे ज्ञान प्राप्त होत नसते. तुम्ही जर सत्वगुणी नसाल तर खरे आत्मज्ञान कधीही तुमच्या जवळपासही फ‌िरकत नाही. इतकेच नाही, तर तुम्ही तमोगुणी असाल तर आत्मज्ञानी गुरूंच्या जवळपास जाण्याचीही बुद्धी तुम्हाला होत नाही, ही १०० टक्के खरी गोष्ट आहे आणि आज तर रजोगुण, तमोगुणालाच महत्त्व प्राप्त झाले आहे. आजचे श‌िक्षण रजोगुणाचा प्रचार, प्रसार व रजोगुण वाढवणारे आहे. रजोगुण जास्त वाढला की पुढे तोच तमोगुणाकडे कसा व कधी जातो ते कळतही नाही. अशी सर्व शोकांतिका आहे. - विजय पांढरे

1
1027 views