अध्यात्म विद्या किंवा तत्वज्ञान
रामदास ढोरमले
पारनेर, अहिल्यानगर
अध्यात्म विद्या म्हणजे एक तत्त्वज्ञान आहे. या विद्येचा शोध मनुष्यात दिव्य गुणांची वाढ करून त्याला त्याच्या परमोच्च ध्येयापर्यंत पोहोचविणे आहे. स्वत:च्या चैतन्य शक्तीचा विकास करून त्याद्वारे परमोच्च आनंद व सृष्टीचे अंतिम सत्य जाणणे हेच मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. यालाच सच्चिदानंदस्वरूप परमेश्वरप्राप्ती सुद्धा म्हणतात. नराचा नारायण बनण्याच्या मार्गावर चालण्याने शेवटी मानवी समाज व्यवस्थाच उत्कृष्ट बनत असते. सत्यप्राप्तीच्या या मार्गाला निश्चित असा अंत नाही. हा सतत चालत राहण्याचा, पाशवीपणाशी अनवरत संघर्ष करीत राहण्याचा मार्ग आहे. चराचरात व्याप्त असलेला परमेश्वर जो अनंत दिव्य शक्तींचा समुच्चय आहे तो माझ्यात सुद्धा सूक्ष्म रूपाने सुप्तावस्थेत विद्यमान आहे आणि त्या शक्तीला विकसित करून ईश्वरप्राप्ती करून घेणे हाच अध्यात्माचा मूळ सिद्धांत आहे