logo

जामिनावर सुटताच चोरट्याचा धुमाकूळ

नाशिक : घरफोडीच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटताच धुमाकूळ घालणारा चोरटा आपल्या साथीदारासह गंगापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कल्याण शहरात संशयिताच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून त्याने राज्यातील विविध ठिकाणी ४० हून अधिक घरफोड्या केल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यात शहरातील ध्रुवनगर भागात राहणाºया बांधकाम व्यावसायिकाच्या घरासह म्हसरूळ आणि आडगाव पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून चोरीच्या सोन्यासह रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा सुमारे ४ लाख ३९ हजार ८६० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित उर्फ मयुर सोपान भुंडे - पाटील (वय ३७) व कुमार भास्कर चौधरी (वय ३५, रा. दोघे टिटवाळा, कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यातील पाटील हा घरफोडी करण्यात सराईत आहे. संशयिताविरोधात राज्यभरात घरफोडीचे गुन्हे दाखल असून जामिनावर सुटताच तो घरफोडी करीत असल्याचे पोलीस सुत्रानी सांगितले.
गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी (दि.२५) भरदिवसा ध्रूवनगर भागात एका बांधकाम व्यावसायिकाचे बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रूपयांचा ऐवज गायब केला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरिक्षक संतोष जुमडे यांनी या गुन्ह्याचा तपासाचे आदेश गुन्हे शोध पथकाला दिले. पोलीस उपनिरिक्षक मोतिलाल पाटील यांच्या पथकाने वेगाने तपासचक्रे फिरविली. घटनास्थळाहून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्याअधारे व तांत्रिक विश्लेषण आणि एका संशयास्पद मोटारीच्या वाहनक्रमांकावरून पथकाने संसयिताचा माग काढला असता तो कल्याण शहरात असल्याची खात्री पटताच पथक रवाना करण्यात आले. तेथे गॅरेज असलेल्या भागातून अट्टल घरफोड्या करणाºया अमित पाटील व त्याला गुन्ह्यात साथ देणारा वाहन चालक संशयित कुमार चौधरी या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलीस तपासात संशयितांनी ध्रूवनगरच्या घरफोडीतील मुद्देमाल पोलिसांना काढून दिला. तसेच आडगाव, म्हसरूळ या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

0
68 views