मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिराप्रमाणे अन्य मंदिरांनी भाविकांच्या कपाळी टिळा लावण्याचा निर्णय घ्यावा !
•मंदिर महासंघाची मागणी•
मुंबई येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शनासाठी येणार्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्रीगणेशाचा आशीर्वाद म्हणून कपाळी टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अभिनंदन करतो. अशाच प्रकारे राज्यातील अन्य मंदिरांनमध्येही कपाळावर टिळा लावण्याचा निर्णय संबंधित मंदिर विश्वस्त तथा मंदिर प्रशासनाने घ्यावा, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने केले आहे.
हिंदु धर्मात कपाळी टिळा लावण्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. कपाळवर टिळा लावण्याने भक्ताला त्या देवतेची शक्ती आणि चैतन्य यांचा लाभ तर होतोच. त्याचबरोबर त्या त्या देवाप्रती भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कृतीने अन्य सर्व मंदिरे अनुकरण करतील, अशी आशा आहे, असे मंदिर महासंघाने म्हटले आहे.