नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेड
आरटीओ कार्यालयावर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा.
नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेड
आरटीओ कार्यालयावर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा.
पुणे: ब्युरो चीफ उमेश पाटील
न्यू महाराष्ट्र गर्जना न्युज –नियमबाह्य भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करावी,अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली.अन्यथा कार्यालयावर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला.निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे कार्याध्यक्ष विशाल मिठे सचिव गणेश कुंजीर उपाध्यक्ष नकुल भोईर संघटक अक्षय गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की दिवाळीमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांना यंदा प्रवासासाठी तिप्पट ते चौपट अधिक भाडे मोजावे लागत आहे.
शहरातील काही ट्रॅव्हल्स कंपन्यांनी नेहमीच्या भाड्यात मोठी वाढ केली आहे.ऐन दिवाळीत प्रवाशांचे दिवाळे काढण्याचा हा प्रकार असून,या भाडेवाढीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने प्रवाशांची लूट होत असल्याचा सूर प्रवाशांमध्ये आहे. एसटीच्या भाड्यापेक्षा दीडपट भाडेवाढ करता येते.मात्र त्यापेक्षा जास्त वाढ केल्यास यावर कारवाई होऊ शकते.
मात्र अशी कारवाई होताना दिसत नाही.पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी उद्योग व्यवसाय आणि शिक्षणासाठी रहिवासी असलेल्यांची संख्या मोठी आहे. दिवाळीसाठी हजारोंच्या संख्येने गावी जातात.रेल्वेचे आरक्षण तीन महिन्यांपूर्वीच फुल झाले आहे.एसटीची तिकिटे मिळणे मुश्किल झाले आहे.त्यामुळे दिवाळीसाठी खाजगी बस ट्रॅव्हल तिकिटांवर अवलंबून राहावे लागते.या परिस्थितीमध्ये ट्रॅव्हल्स कंपन्या अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्याने या चालकांची मनमानी सुरू असल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री बसत आहेत.
पाचशे रुपये तिकीट दर असताना दीड हजार रुपये आकारले जात आहे.या वर आरटीओचा अंकुश हवा.त्वरित अशा लोकांवर कारवाई करावी,अन्यथा संभाजी ब्रिगेड स्टाईलने आरटीओ कार्यालयावर आंदोलन छेडले जाईल,असा इशारा सतीश काळे यांनी निवेदनात दिला आहे.