logo

पिंपरीत अजित पवारांनी आमदाराचे तिकीट कापले?: अण्णा बनसोडेंना एबी फॉर्म नाही, नवीन चेहऱ्याला संधी मिळणार?

पिंपरीत अजित पवारांनी आमदाराचे तिकीट कापले?: अण्णा बनसोडेंना एबी फॉर्म नाही, नवीन चेहऱ्याला संधी मिळणार?
पुणे: ब्युरो चीफ उमेश पाटील
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांकडून आता उमेदवार जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात भाजपने पहिली यादी जाहीर करत 99 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. तसेच महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र विद्यमान आमदाराचे तिकीट कापल्याचे समोर आले आहे.
अजित पवारांनी अनेक उमेदवारांना एबी फॉर्म दिले, मात्र पिंपरी येथील विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना मात्र एबी फॉर्म देण्यात आला नाही. याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त शहराध्यक्ष योगेश बेहल यांनी सांगितले आहे. नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी अशी मागणी पक्षातून केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच योगेश बेहल यांना शिंदे गटातील जितेंद्र ननावरे यांच्यासाठी फिल्डिंग लावायची असल्याने त्यांनी बनसोडे यांना विरोध केला
असल्याचे बोलले जात आहे.
काय म्हणाले योगेश बेहल?
योगेश बेहल म्हणाले, महायुतीमधील सर्व उमेदवार कसे निवडून येतील याकडे आम्ही पाहणार आहोत. पिंपरीमध्ये जो कोणी उमेदवार असेल किंवा अण्णा बनसोडे असतील किंवा अजून कोणी नवीन उमेदवार दिला जाईल त्याला निवडून देणे ही आमची जबाबदारी असणार आहे. पुढे बोलताना योगेश बेहल म्हणाले, पक्षातून अण्णा बनसोडे यांना विरोध आहे असे मला दिसत नाही, परंतु काही छोट्या कारणावरून नाराजी आहे, नाही असे नाही, पण ती नाराजी दूर करता येईल, असे योगेश बेहल म्हणाले.
पुढे बोलताना योगेश बेहल म्हणाले, अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देण्यावर देखील काही हरकत नाही किंवा पक्षाला नवा चेहरा द्यायचा असेल तरी देखील काही हरकत नाही. मी कोणासाठी फिल्डिंग लावत नाही. पक्षातील इच्छुक उमेदवारांची माहिती पक्षाला दिली आहे, जे नेते इच्छुक आहेत, त्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही त्यांच्यासाठी काम करू, इच्छुकांमध्ये आण्णा बनसोडे, जितेंद्र ननवरे, सीमा सावळे, काळूराम पवार ही नावे चर्चेत आहेत. यांच्यापैंकी कोणालाही पक्षांने उमेदवारी दिली तरी आम्ही जोमाने त्यांची कामे करू, असे आश्वासन योगेश बेहल यांनी दिले आहे.

12
1202 views