logo

होमगार्ड भरती प्रकियेवर प्रश्नचिन्ह! न्यायासाठी उमेदवारांचा आमरण उपोषणाचा निर्धार

मुंबई, दि. १६ प्रतिनिधी :
होमगार्ड गृहरक्षक दल भरती प्रक्रिया २०२४ मध्ये पात्र उमेदवारांना अपात्र केल्याच्या निषेधार्थ उमेदवारांनी नुकतीच होमगार्ड दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, लोकप्रतिनिधींची भेट घेतली. यावेळी पात्र असूनही अपात्र ठरविण्यात आले असल्याचे सांगत मागील महिनाभर केवळ न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत परंतु, अद्यापही भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याचा प्रश्न अद्याप सोडवण्यात आलेला नाही. प्रश्न वेळीच मार्गी न लागल्यास अखेर आंदोलन हाच पर्याय असेल, असा इशारा उमेदवारांनी यावेळी दिला.
उमेदवारांची मैदानी परीक्षा ऑगस्ट अखेरीपासून दि. २ सप्टेंबर पर्यंत मुंबईत घाटकोपर येथील मैदानावर घेण्यात आली. या भरती प्रक्रियेमध्ये मुंबई जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार ५४९ महिला व पुरुष सदस्य यांच्या जागा भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले होते, यासाठी संबंधित संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यापैकी बृहन्मुंबई जिल्ह्यामध्ये पुरुष व महिला नागरिकांनी एकूण दोन हजार २४७ अर्ज केलेले होते. मात्र यापैकी फक्त ३२१ उमेदवारांना पात्र तर इतर सर्व उमेदवार हे अपात्र ठरविण्यात आले. दरम्यान, आम्ही पात्र असतानाही आम्हाला अपात्र ठरविण्यात आले आहे. हा आमच्यावर अन्याय आहे. न्यायासाठी आम्ही प्रशासन व शासन दरबारी प्रयत्न करीत आहोत. आम्हाला रोजगार मिळावा, हा आमचा प्रमाणिक मुद्दा आहे आणि जिल्हा भरतीप्रमाणे स्थानिक मुंबईवासी म्हणून आमचा हक्क आम्हाला मिळायला पाहिजे. यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. वेळेत दखल न घेतल्यास रोजगारासाठी आमरण उपोषण करू, असा इशारा उमेदवारांनी यावेळी दिला.

फेरफार झाल्याचा संशय
- पुरुष व महिलांची मैदानी चाचणी झाल्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये मार्क त्याच जागी सांगितले जातात, तसेच त्यांची सही त्याजागी घेतली जाते व दिनांक टाकली जाते परंतु, असे काहीही इथे घडलेले नाही. इतर जिल्ह्यांप्रमाणे मुंबईची लिस्टही लावण्यात आलेली नाही, थेट पात्र आणि अपात्र या दोन लिस्ट फक्त लावण्यात आल्या आहेत. सर्व उमेदवार आलेले आहेत, अशी एक लिस्ट लावण्यात येत असते, त्याप्रमाणे अशी कोणतीही लिस्ट लावण्यात आलेली नाही. त्यामुळे थेट अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांच्या मते या भरती प्रक्रियेतील मार्कांमध्ये फेरफार करण्यात आलेला आहे, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

नेमके प्रकरण काय?
- जीआर नुसार ही भरती २५४९ महिला व पुरुषांकरिता
- २२४७ अर्ज त्यातील फक्त ३२१ पात्र

उमेदवारांचे नेमके म्हणणे
- मैदानी प्रक्रियेदरम्यान चेस्ट क्रमांकात बदल
- कित्येक उमेदवारांना धावण्यात शून्य मार्क
- बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये इतर जिल्ह्याप्रमाणे तांत्रिक, एमएस सीआयटी, आयटीआय, प्रमाणपत्रधारक, यांचे मार्क नाही
- खेळामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या उमेदवारांना, मार्क नाहीत. एन.सी.सी.बी प्रमाणपत्र, यांचेदेखील मार्क नाही
- जड वाहन चालक परवानाधारक याचे मार्क नाही तर, गोळा फेक हा आऊट ऑफ असताना सुद्धा त्याचे मार्क कमी

"भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. पात्र ठरलेल्या उमेदवारांची त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे रितसर निवड करण्यात आलेली आहे तर अपात्र उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार बाद करण्यात आले आहे."
- संदीप जाधव, होमगार्ड समादेशक, मुंबई

"भरती प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडली असून उमेदवारांना धावणी दरम्यान चीप लावण्यात आली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आलेली नाही."
- राजू सांबर, होमगार्ड कंपनी नायक

"होमगार्डच्या भरती प्रक्रियेत पात्र झालेल्या उमेदवारांची संख्या फक्त ३२१ आहे. दरम्यान शासनाने याच नाही तर इतर भरती प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती शिथिल करून राहिलेल्या उमेदवारांना पात्र करावे जेणेकरून भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना संधी मिळेल आणि काही अंशी बेरोजगारी कमी करण्यास मदत होईल. तसेच होमगार्डच्या या प्रकरणात उमेदवारांवर झालेल्या अन्यायाची शासनाने सखोल चौकशी करणे गरजेचे आहे."
- केतन कदम, अध्यक्ष, बेरोजगार युवा समिती

33
9592 views