logo

कृषि विद्यापीठात सौर ऊर्जेवरील सिंचनप्रणाली या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

सौर उर्जेवरील सिंचन प्रणाली शेतकर्यांसाठी लाभदायी- कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ, दि. 15 ऑक्टोबर, 2024
राहुरी कृषि विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्सलन्स अद्ययावत व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान या प्रकल्पाचे काम फार महत्त्वाचे आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत 282 प्रशिक्षणार्थींना जबलपूर येथील बिसा संस्थेत सौर उर्जेवर आधारित सिंचन प्रणालीचे प्रशिक्षण देण्याकरिता पाठविण्यात आले. यामध्ये विद्यार्थी, शेतकरी व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश होता. अशा पद्धतीने कार्य करणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ हे भारतामध्ये एकमेव आहे. सध्या विद्यापीठांमध्ये 400 एकर क्षेत्रावर 100 किलोवॅट सोलर प्रकल्पाचे काम सुरू आहे. शेतकर्यांना अखंडित व पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्यामुळे पिकांचे पाणी व्यवस्थापन वेळेवर करणे शक्य होत नाही. त्यामुळे सौर उर्जेवरील सिंचन प्रणाली शेतकर्यांसाठी लाभदायी असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि अभियांत्रिकी विभागातील सेंटर ऑफ एक्सलन्स- स्मार्ट व काटेकोर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञान प्रकल्पाने या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या एक दिवसीय कार्यशाळेचा विषय सौरऊर्जेवरील सिंचन प्रणाली हा आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानावरून महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील बीसा या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रा. अरुण जोशी उपस्थित होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार उपस्थित होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे व पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रा. अरुण जोशी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की शेतकरी हा सर्वांना अन्न पुरवितो म्हणून त्यांना आपण देवतास्थानी मानतो. अशा या देवता समान असणार्या शेतकर्यांसमोर अनंत अडचणी आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुख्य समस्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वेळेवर न होणे ही आहे. यासाठी अखंड व पुरेशा दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने उत्पादनात घट येते. यावर जबलपूर येथील बीसा केंद्राने जी.आय. झेड. च्या मदतीने सोलरवरील प्रशिक्षणे सुरू करून मार्ग शोधला आहे. सौर पंपाच्या वापराने पाण्याची समस्या सुटेल व खर्या अर्थाने शेतकरी सुखी होईल. आपली कृषि संस्कृती जपण्यासाठी सौर ऊर्जेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी डॉ. सुनील गोरंटीवार आपल्या भाषणात म्हणाले की राहुरी कृषि विद्यापीठाने फार पूर्वी शेतीच्या सिंचन पद्धतीसाठी सौरऊर्जा उपयोगी ठरू शकते या विषयावर लक्ष केंद्रित करून संशोधन सुरू केले. खंडित वीजपुरवठा व आहे ती वीज पुरेशा दाबाने नसणे यावर सौर ऊर्जेचा वापर हा पर्याय महत्त्वाचा ठरणार आहे. बिहार राज्यातील वैशाली येथील जी.आय. झेडने आयोजित केलेल्या सोलरवरील प्रशिक्षणामुळे आम्हाला या संदर्भात संशोधन करण्यासाठी गाईडलाईन्स मिळाल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या एक दिवसीय कार्यशाळेसाठी नवी दिल्ली येथील जी.आय.झेडच्या ऊर्जा सल्लागार प्रा. प्रेरणा शर्मा, नाशिक येथील मेडाचे विभागीय जनरल मॅनेजर श्री. हेमंत कुलकर्णी, नवी दिल्ली येथील बीसाचे सहयोगी संशोधक डॉ. परेश शिरसाठ, जबलपूर येथील बीसाचे स्टेशन कोऑर्डिनेटर व प्रमुख डॉ. महेश मस्के, जबलपूर येथील बीसाचे मृदाशास्त्रज्ञ डॉ. विवेक सिंग, जबलपूर येथील सौर उर्जेचे तज्ञ श्री. प्रभात कनोजे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत सदरील शास्त्रज्ञ तसेच व्याख्याते यांनी सौर ऊर्जेवरील सिंचन प्रणाली या विषयावरील विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी तर आभार डॉ. सुनील कदम यांनी मानले. या कार्यशाळेसाठी बीसा, जबलपूर येथे सौर ऊर्जेवरील प्रशिक्षण घेतलेले शेतकरी, विद्यार्थी तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0
65 views