
सूरज चव्हाण मराठी बिग बॉस ५ चा विजेता…
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही समाजव्यवस्थेतील एक वर्ग आजही वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद जोपासत असल्याचा प्रत्यय बिग बॉसमध्ये सूरज चव्हाण विजेता ठरल्यानंतर आला. अर्थात हा वर्ग कुठल्याही एका जातीचा नाही, सर्वच जातीत हा वर्ग आहे.
स्वतःला पुढारलेले समजणारे हे लोक गरीब, अशिक्षित, कृष्णवर्णीय लोकांचा नेहमीच तिरस्कार करत आले आहेत. अडाणी म्हणून त्यांना हिणवत आले आहेत. रूप, वर्ण ही निसर्गाची देणं आहे, त्याविषयी तक्रार असता कामा नाही. सूरज चव्हाण बहुमताच्या जोरावर बिग बॉस ५ ची ट्रॉपी जिंकला. महाराष्ट्रातील जनतेने त्याला भरभरून मतदान केले. त्यामुळे तो विजयी ठरला. कारण तो प्रत्येकाला त्याच्या स्वभावामुळे जवळचा वाटला. आपला वाटला. हे तथाकथित काही वर्णद्वेषी मंडळींना पटलले दिसत नाही. काहींच्या प्रतिक्रियावरून तसे दिसते.
खरं तर बिग बॉसचा एकही एपिसोड मी पाहिलेला नाही. मात्र या कार्यक्रमातील सहभागी झालेल्या सेलिब्रिटींविषयी कल्पना होती. त्यांची नावे माहीत होती. त्यात सूरज चव्हाण हाच एक तितकाशा परिचित चेहरा नव्हता. मात्र त्याने स्वतःचे रूप, वर्ण, अशिक्षितपणा याचा न्यूनगंड न बाळगता तो या स्पर्धेत सहभागी झाला, याचे कौतुक आहे. त्याच्या भाबडेपणा, निरागसपणाची टिंगल काही लोक करत आहेत. मात्र ज्या लोकांनी त्याच्या व्यंगाची टिंगल केली, तेच त्याचे बलस्थान ठरले.
भोळ्या शंकराचा भक्त असलेला सूरज चव्हाणचा ओम् नम शिवायचा सातत्याने नामजप त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा प्रत्यय देतो. बिग बॉगचा विजेता ठरणार हा याविषयी त्याच्या मनात साशंकता नव्हती, हे त्याच्या प्रतिक्रियेवरून कळते. विजेता ठरल्याचे घोषणा झाल्यानंतर तो जराही एक्साईटिंग झाला नाही.
गाव खेड्यातील एका गरीब कुटुंबातून आलेल्या आई - वडिलांचे छत्र हरपलेल्या या तरुणाकडून आजच्या युवा पिढीने शिकण्यासारखे बरेच काही आहे. लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता, मनात कोणताही न्यूनगंड ना बाळगता आपले लक्ष्य गाठत अशा तिरस्कारी स्वभावाच्या मंडळींची तोंडं बंद करावी, हेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.
सूरज चव्हाण मन:पूर्वक शुभेच्छा…!