
सचिन नागरे यांना महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार जाहीर
बुलढाणा- येथील युवा कार्यकर्ते सचिन जगन नागरे यांना नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद वतीने यंदाचा महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र, सन्मानपत्र, मेडल, तांब्रपट व महात्मा कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचे पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या परिषदेचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील यांनी पुरस्कार निवड मानपत्राव्दारे नुकतेच त्यांना कळवले आहे. येत्या काही दिवसात हा पुरस्कार त्यांना वितरित केल्या जाणार आहे.सचिन नागरे हे मुक्त पत्रकार, कृषी पदवीधर असून लेखक, साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते सुध्दा आहेत. अंबाजोगाई येथील मानवलोक सामाजिक संस्था, घाटंजी येथील विकासगंगा समाजसेवी संस्था व आनंदवनचे थोर समाजसेवक बाबा आमटे यांची महारोगी सेवा समितीच्या समाजभान प्रकल्पातही त्यांनी काम केलेले आहे. त्याचबरोबर पुणे येथे दैनिक लोकमत मध्ये सुध्दा ते काही काळ एसएमटी म्हणून कार्यरत होते. सचिन नागरे यांचे ज्वलंत समस्यांविषयीचे विविध वृत्तपत्रातील पत्रलेखन, स्वच्छता, महागाई,भ्रष्टाचार व आदीं विषयीचे चारोळी लेखन ,जनजागृती सामाजिक कार्य, सोशल मीडियावरील जनसंपर्क व आदीं कार्याची विचारपुर्वक दखल घेऊन या त्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांचा जागृती हा चारोळी संग्रह महाराष्ट्रभर पोहचलेला आहे. विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही त्यांनी विविध कामे केलेली आहेत.हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्वत्रच कौतुक होते आहे.