
जुगनी येथील आदिवासी बांधवांचे तिस-या दिवशीही उपोषण सुरूच
अध्यक्ष मोठा की सचिव मोठा,उपोषण कर्त्यांचा सवाल
शहादा प्रतिनिधी: अक्राणी तालुक्यातील जुगनी येथील प्रलंबित एकूण ११ वनदावे तात्काळ निकाली काढा,या मागणीसाठी वनदावेदारांनी उपविभागीय अधिकारी शहादा कार्यालयासमोर छेडलेले बेमुदत तिस-या दिवशीही सुरूच आहे. उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी हे जाणीवपूर्वक आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. वन हक्क समितीच्या बैठकीत अध्यक्षांनी सही केली ,परंतु सचिवांची सही राहिली आहे. सहाय्यक प्रकल्प अधिकारी सायराबान हिप्परगे यांनी पुनर्रपडताळणी करण्याचे निर्देश आम्हाला दिले आहेत, अशी उडवा उडवीची उत्तरे सुभाष दळवी यांनी दिली.त्यामुळे अध्यक्ष पद मोठे की सचिव पद मोठे हा सवाल उपस्थित होतो. उपविभागीय अधिकारी हे दिशाभूल करणारी उत्तरे देऊन आमची फसवणूक करीत आहेत, असा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे.टेंब-या वळवी,बारक्या वळवी,बारक्या पावरा,वांग-या पाडवी,जोमा वळवी, बिंद्या वळवी,उत-या वळवी,गारद्या पाडवी,रिहज्या पावरा,तुबड्या वळवी,बांग्या वळवी आदि ११ वनदावेदारांसरह दिलवरसिंग पाडवी आदि जुगनी गावातील प्रलंबित वनदावेदार उपोषणास बसले आहे.
सदर वनहक्क दावे दारांना वारंवार कार्यालयात हेलपाटे घालायला लावून शारिरीक व मानसिक त्रास दिला जात आहे.त्यांचे वनहक्क दावे जाणीवपूर्वक संबंधित लिपिक व अधिकारी हे निकाली काढत नाहीत, असा आरोप वनदावेदारांकडून करण्यात येत आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा,नाहीतर खुर्च्या खाली करा,वनदावे निकाली काढा, नाहीतर खुर्च्या खाली करा,या अधिका-यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय अशा जोरदार घोषणा उपोषण कर्त्यांनी दिल्या.उपोषण कर्ते आपल्या मागणीवर ठाम राहत त्यांनी रात्रीही उपोषण सुरूच ठेवले आहे.