logo

जगाचा पोशिंदा तरीपण उपाशी कटू आहे पण सत्य आहे; शेतकऱ्यांच्या आयुष्याची संघर्षमय कहाणी !!

पुणे विभागीय संपादक- संजय चांदगुडे

मि भाजी आणण्यासाठी आठवडी बाजारात गेलो होतो, दरवेळेप्रमाणे आठवडयाला हा आठवडे बाजार भरत असतो. काल 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील एक शेतकरी आपल्या शेतात पिकवलेला घेवडा घेऊन बाजारात विकायला आलेला होता.
घेवड्याचं पोतं खांद्यावर घेऊन तो एका दुकानात आला. त्याने दुकानदाराला म्हटलं एवढं तुमच्या काट्यावर वजन करून द्या. ते 20 किलो भरलं. मग त्याने तो घेवडा एका पसरलेल्या पोत्यावर ओतला.आज बाजारात गिऱ्हाईक कमीच होतं. त्याने 10 रु पाव किलो दर काढला होता. थोड्या वेळाने तिथे बाजारात इतर भाजीपाला विकणारे तिघेजण पण आले होते.

त्यांनी शेतकऱ्याकडे प्रत्येकी 5 किलो घेवडा मागितला. याने 35 रु किलो दर सांगितला. त्यांनी 30 रू किलोनी त्याच्याकडून घेवडा घेतला. तेही त्याच दुकानदाराच्या वजन काट्यावर वजन करून घेण्यासाठी आले. प्रत्येकाला 5 किलो दिला. त्यात प्रत्येकाने पाव किलो घेवडा जादा मागून घेतला. शेतकऱ्यानेही कोणतीही कुरबुर न करता तो घेवडा दिला. त्यांनी तो माल विकून झाल्या नंतर त्याचे पैसे आणून दिले. या व्यापाऱ्यानी एक रुपयाही पदरचा न गुंतवता पैसा मिळवला. परंतू त्या शेतकऱ्याने मात्र जमिनीची नांगरट करून त्यात बिया, खते, औषधं, इतर मजुरांचा खर्च, तोडणीचा खर्च, वाहतुकीचा खर्च परत बाजारात बसून विकण्यासाठी घालवलेला वेळ,त्याच्या कुटुंबाचे, त्याचे कष्ट, अशी कितीतरी गुंतवणूक केलेली होती. परंतू इतके गुंतवून त्याला मिळाले किती? हा खरंच संशोधनाचा विषय आहे.

शेतकऱ्याचा मालही तासा-दोन तासात संपला. त्यानंतर तो त्या दुकानदाराकडे आला अन त्याला 10 रु दिले. मी विचारलं हे कशाचे? तर म्हणाला मघाशी ती वजनं केली नाहीत का, त्याचे हे पैसे?.... हे ऐकून दुकानदार हा स्तब्धच झाला. दुकानदाराने ते पैसे त्याला परत दिले.

त्याच्याशी काय बोलावे हेच कळेना. तरीही त्याला दुकानदाराने म्हटलं
बिचाऱ्या इतकाही चांगला वागू नको रे या दुनियेत... नाहीतर आयुष्यभर दुसऱ्याची पोटं भरून तू मात्र मरेपर्यंत असाच उपाशी राहशील,आणि या अन्यायी ,असंवेदनशील व्यवस्थेसमोर हतबल होऊन मरणाला जवळ करत राहसील.. अशी ही कृषीप्रधान देश म्हणून आणाऱ्या आपल्या भारताची ओळख आहे जेथे जो शेतकरी राजा आपल्या सर्वांचे पोट भरण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो परंतू त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नसू नये ही सर्वात मोठी शोकांतिका आहे, तसेच त्याच्या जीवावर मधले दलाल हे मोठे झाले परंतू माझा शेतकरी राजा हा कायमचं दारिद्रयाच्या खाईत लोटला गेला आहे.

तरी मायबाप सरकारने याचा जरा विचार करून त्याला त्याच्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार दयावा तसेच त्याचं उत्पन्नाच मूल्य वाढवण्यासाठी ठोस अशा उपाययोजना कराव्यात. जेणेकरून त्याचा फाटका संसार निट सावरण्यास मदत होईल, ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ तसेच शेतीसाठी काढलेल्या कर्जापायी दरवर्षी हजारोंच्या संख्येने माझ्या बळीराजाच्या आत्महत्या होत असतात त्यासाठी सुद्धा कोठेतरी उपाययोजना व्हावी जेणेकरून ह्या होणाऱ्या आत्महत्या होणार नाहीत. तसेच ओला दुष्काळ पडला सुखा दुष्काळ पडला कि शासन नुसत जीआर काढतं परंतू त्याला दुष्काळनिधी मिळवण्यासाठी मोठया प्रमाणात कागदपत्रं मागतली जातात त्याला वेळेत ही मदत मिळतच नाही या गोष्टींकडे सुद्धा गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आता निर्माण झाली आहे नाही तर मंत्र्यांच नुसतेच दुष्काळी दौरे काढले जातात परंतू त्या बळीराजा पर्यंत वेळेत मदत पोहचतचं नाही. त्यामुळे तो आत्महत्यासारख्या मार्गाकडे आपोआपच ओढला जातो. हे आता कोठेतरी थांबल पाहिजे. हा लेख माझ्या सर्व शेतकरी राजाला समर्पित..

शब्दांकन- संजय चांदगुडे (पुणे विभागीय संपादक )

10
5694 views