
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द !
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द !
दि. २८ ऑगस्ट, २०२४.
प्रति,
मा. पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी,
विषय: पालघरचा भूमिपुत्र तसेच पालघरचा निसर्ग संरक्षणासाठी प्रस्तावित वाढवण बंदरसाठी आपण भूमीपजन करू नये व प्रस्तावित बंदर रद्द करणेबाबत.
मा. महोदय,
जोहार जिंदाबाद,
आपण दि. ३० ऑगस्ट, २०२४ रोजी पालघरच्या जिल्ह्याच्या आदिवासी मच्छीमार भूमिपुत्रांच्या मुळावर उठलेल्या, पालघरचे पर्यावरण धोक्यात घालणारा प्रस्तावित “वाढवण बंदर” याचे भूमीपूजन करण्यासाठी येत असल्याचे समजते. माझ्या देशाचा पंतप्रधान माझ्या जिल्ह्यात येत आहे याचा खरं तर आम्हा भूमिपुत्रांना आनंद व्हायला पाहिजे. परंतु, आपण आपल्या उद्योजक मित्रासाठी किती कष्ट घेत आहात हे सर्वश्रृत आहे.
पालघर जिल्ह्याला नको असलेले वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, सागरी महामार्ग इ. विनाशकारी प्रकल्प केवळ आपल्या मित्र परिवारासाठी आपण लादत आहात. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असे असले तरी भारताच्या संविधानाने दिलेले ५ व्या अनुसूचीतील अधिकार, पेसा कायदे व आदिवासी संरक्षणासाठी असलेले इतर सांविधानिक तरतुदींचा आपले केंद्र तसेच राज्य सरकार सातत्याने नाकारत आहे. या अन्याय विरोधात पालघरचा आदिवासी, मच्छिमार, शेतकरी भूमिपुत्र सतत्याने संघर्ष करत आहे. तरी देखील आपण जनतेवर हे प्रकल्प लादत आहात.
मणिपूर असो, की बिल्कीस बानो, हस्थरस, उन्नाव असो की महिला कुस्तीपटूंवरील अत्याचार अशा सर्व प्रकरणात आपण ब्रुजभूषण सारख्या प्रवृत्तींना पाठीशी घालत आहात. बदलापूर मधे दोन चिमुरड्यावर जो अत्याचार झाला त्यातही आपले सहकारी संबंधित संस्थाचालकाला संरक्षण देण्याचे काम करत आहेत. महिलांवरील अत्याचार कोलकात्यात होवो वा बदलापूरला गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे. परंतु आपण पंतप्रधानपदी बसून न्यायाची भूमिका घेत नाही उलट गुन्हेगारांना पाठीशी घालत आहात हे खेदजनक आहे.
काल परवाच तुमच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी घाई गडबडीत उभारलेला पोकळ पुतळा कोसळला. शिव छत्रपतींनी शेकडो वर्षे उभारलेले गड किल्ले अजूनही ऊन पाऊस सहन करुन उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे हिंदवी स्वराज्य स्थापले, महाराष्ट्र घडवला, सबंध देशाला न्यायाची, समतेची लोक कल्याणाची दिशा दाखवली त्या महाराजांचा पुतळा सदोष बनवून आपण महाराजांचा अपमान केला आहे.
ज्या पालघर मधे एक साधे इस्पितळ उभारले जाण्यासाठी शासनाकडे पैसा आणि इच्छा नाही तिथे उद्योजक मित्रांच्या भल्यासाठी काही लाख कोटी रुपयांचे विनाशकारी प्रकल्प लादले जात आहे. अशा प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी आपण येणे म्हणजे स्थानिक आदिवासी, मच्छीमार, शेतकरी भूमिपुत्रांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. तरी शासकिय यंत्रणेला वेठीस धरून गावागावातून आंगणवाडीसेविका, बचतगट इ. पक्षाचे कार्यकर्ते याना बस मधे भरुन गर्दी करुन सरकारी खर्चाने राजकीय कार्यक्रम व वाढवण बंदरचे भूमीपूजन करू नये असे आमचे आपणास नम्र आवाहन आहे.
आमच्या अस्तित्वासाठी, महाराष्ट्र तसेच मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी पालघरचा भूमिपुत्र विरोध करणारच.
एकच जिद्द वाढवण बंदर रद्द !
आपले नम्र,
पालघरचा समस्त आदिवासी - मच्छिमार - भूमिपुत्र