
बुलढाणा विधानसभा मतदार संघ काँग्रेसचाच !-
कार्यकर्ता मेळाव्यात ठाम निर्धार
बुलढाणा:विधानसभेच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर आज बुलढाण्यात झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बुलढाणा विधानसभा मतदार संघावर भरभक्कम दावा नोंदविण्यात आला असून हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच लढणार अशी खंबीर भूमिका आज कार्यकर्त्यांनी एकमुखाने व्यक्त केली आहे.स्थानिक गर्दे वाचनालय सभागृहात झालेल्या या मेळाव्यात ही ठाम व स्पष्ट भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. खचून भरलेल्या या सभागृहात आज मंचकावर सामान्य कार्यकर्ते बसले होते तर मतदार संघातील नेते मंडळी खाली बसलेले होते. सभागृहात जमलेल्या संख्येएवढेच कार्यकर्ते सभागृह बाहेर सुद्धा उपस्थित होते. मेळावा म्हणून एकत्र आलेल्या सर्व सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी खुल्या मनाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मेळाव्याच्या सुरुवातीलाच तीन ठराव मांडण्यात आले होते. बुलढाणा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, गत दोन निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराचे निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तीलाच तिकीट द्यावे व एक दिलाने सर्वांनी हर्षवर्धन सपकाळांच्या पाठीशी रहावे असे हे ठराव होते. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी हात वर करून तीन ही ठराव पारीत केले. शेवटी हर्षवर्धन सपकाळ यांनी नवचैतन्य व आत्मविश्वास निर्माण करणारे मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यकर्त्यांतील उत्साह व एकजूट वाखाण्याजोगी होती. उत्स्फूर्त देणे पूर्ण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या मेळाव्याचे वैशिष्ट म्हणजे कार्यक्रमाचे संचलन कोणी केले नाही तर आभार प्रदर्शन देखील झाले नाही.