logo

अत्याचार करणाऱ्या नराधमाची धिंड काढून फाशीची शिक्षा द्या.! उमरग्यात महिलांची आक्रोश मोर्चात, प्रशासनाकडे मागणी


धाराशिव जिल्ह्यातील,उमरगा शहरातील चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाची धिंड काढून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, पीडित बालिकेला व कुटुंबाला जलद न्याय मिळवून देत शासन, प्रशासन स्तरावरून आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यासाठी सोमवारी उमरगा येथील,राष्ट्रीय महामार्गावरून तहसील कार्यालयावर हजारो महिला व युवतींनी आक्रोश मोर्चा काढून उमरगा तहसीलदारांना निवेदन दिले.
उमरगा तहसीलदार गोविंद येरमे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एका चार वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना शहरात १३ जुलैच्या रात्री आठ ते नऊच्या सुमारास घडली.
उमरगा शहरात चार वर्षीय चिमुकली आपल्या आईसोबत आजोळी आली होती. शनिवारी रात्री आई घरी स्वयंपाक करत असताना, चिमुकली घराबाहेर भावंडांसोबत खेळत होती. यावेळी अनिल देवेंद्र कांबळे (रा. भीमनगर, ता. बसवकल्याण) याने चिमुकलीला चॉकलेटच्या बहाण्याने खांद्यावर उचलून घेतले. वेल्डिंगच्या दुकानासमोरील टपरीच्या आडोशाला नेत दुष्कर्म केले. या नराधमाने मुलीच्या गालाला व शरीरास नखाने ओरबाडले. चिमुकलीने आरडाओरड केल्याने आवाज ऐकून काही नागरिक धावत आले. संतप्त जमावाने आरोपीला चोपले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अनिल देवेंद्र कांबळे यांच्याविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपी नराधम अनिल देवेंद्र कांबळे वय 54 वर्षे भीमनगर ता. बसवकल्याण, जि. बिदर याची शहरातून धिंड काढून 'जशाच तसे' या न्यायाने फाशीची शिक्षा द्यावी. पीडित बालिकेला मोफत शासकीय आरोग्य उपचार व शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळून द्यावी, उमरगा शहरात परराज्यांतून कामानिमित्त आलेल्या लोकांवर व ज्या ठिकाणी काम करत असेल अशांची
नोंद ठेवून कडक नियंत्रण ठेवण्यात यावे, आरोपीला जेलमध्ये कसल्याच प्रकारची सोयीसुविधा न देता अंधार कोठडीत ठेवावे, पीडित बालिकेला फास्ट ट्रैक कोर्टात महिन्याच्या आत जलद न्याय मिळवून द्यावा,उमरगा शहरातील शाळा, महाविद्यालया भोवताली फिरणाऱ्या रोडरोमियोंची साध्या पोशाखामध्ये पोलिस प्रशासन व शासनाने हेर व पोलिस खात्यातील व्यक्तीची नेमणूक करून बंदोबस्त करावा, उमरग्यातील गल्लोगल्लीत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
उमरगा येथे काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात,राष्ट्रीय महामार्गावरून हजारो महिला व युवतींनी घोषणा देत हा आक्रोश मोर्चा काढला. त्यात जिजाऊ ब्रिगेड, ऑल इंडिया धनगर समाज, वीरशैव महिला मंडळ, गौतमीबाई मल्हारराव होळकर महिला मंडळ, राजपूत महिला मंडळ, जीवन संघर्ष महिला संघ यासह शहरासह
तालुक्यातील सकल महिला मंडळाच्या हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, अविनाश रेणके, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या रेखाताई सूर्यवंशी, मीनाक्षी दुबे आदींनी मोर्चास संबोधित केले.
निवेदनातील मागण्या शासनदरबारी मांडून पीडित व कुटुंबास जलद न्याय मिळवून देण्यासोबतच सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच परप्रांतीय भाडेकरूची पोलिसांत नोंद करण्यास सांगून तालुक्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ग्वाही दिली.

27
10957 views