logo

त्यांच्या सन्मानार्थ तरी अवैध धंदे बंद ठेवा होऽऽ ? Shaikh Asif Shaikh Yusuf Buldana Maharashtra AIMA न्यूज बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे इन्स्पेक्शनसाठी उद्यापासून चार दिवसांचा दौरा

बुलढाणा, 20 जुलै (AIMA न्यूज) ः होय ! तेच आयपीएस कृष्णप्रकाश, ज्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून बुलढाण्यात सेवा दिली असतांना अवैध धंदे शंभर टक्के बंद होते.. ज्यांच्या धाडसी कारवायांनी अजूनही बुलढाण्यातील अनेक गुन्हेगारांना धडकी भरते ! ज्यांची वाणी आणि लेखणी दोन्हींनी बुलढाणा जिल्हावासियांना प्रभावित केले.. असे लोकप्रिय, कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यतत्पर पोलिस अधिकारी कृष्णप्रकाश चार दिवसांच्या बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर आहेत. त्यांचे मनःपूर्वक स्वागत…!! विशेष म्हणजे त्यांच्या हृदयाच्या कोपर्‍यात बुलढाणा शहराला स्थान आहे. बुलढाणा जिल्ह्याने त्यांना प्रसिद्धीच्या यशोशिखरावर नेवून ठेवलेले होते. एसपी म्हणून पहिला जिल्हा, ही बाब आहेच परंतु या शहरात त्यांची मुलगी शौर्या (झोया) हिचा जन्म झालेला आहे. त्यामुळे बुलढाणा हे गांव त्यांच्या आजन्म चिरस्मरणात राहणार आहे. 2004 मध्ये बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर काम करणारे कृष्णप्रकाश आता अतिरीक्त पोलिस महासंचालक पदापर्यंत पोहोचले आहेत. फोर्स वन या सर्वाधिक वेगवान आणि चपळ पोलिस फोर्सचे राज्याचे प्रमुख म्हणून कृष्णप्रकाश काम पाहत आहेत. अतिरीक्त पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश उद्या, 21 जुलैपासून चार दिवस बुलढाणा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. किमान त्यांच्या सन्मानार्थ तरी बुलढाणा जिल्ह्यात गल्लो-गल्ली बोकाळलेले अवैध धंदे बंद होतील का ? अशी भाबडी अपेक्षा शांतताप्रिय बुलढाणेकरांची आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक पदाची खरी ओळख बुलढाणेकरांना करून देणारे आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यंानी वेश बदलून बदलून गुन्हेगारांना धडे शिकविले होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कृष्णप्रकाश जेव्हढे गंभीर होते, तेव्हढेच ते माणूसकी जपण्यात लोण्यासारखे मऊ आहेत. गुन्हेगारांना पकडून होणार नाही तर गुन्हे होवू नये म्हणून गुन्हेगारांची सामाजिक पार्श्वभूमि बदलली पाहीजे, या विचारमंथनातून त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात प्रेरणादायी उपक्रम राबविले होते. भिल्ल समाजाच्या युवकांना नोकरी, पारधी पुनर्वसनाचा प्रश्न, वेश्यांचे सामाजिक पुनर्वसन तसेच सामाजिक बंधुभाव वृद्धींगत होण्यासाठी त्यांनी काही योजनाबद्ध कार्यक्रम प्रत्येक पोलिस स्टेशनअंतर्गत राबविले होते. कृष्णप्रकाश यांच्यातील प्रामाणिकता आणि मन जिंकणार्‍या स्वभावाने त्यांना नेत्यांपेक्षाही लोकप्रिय बनविले होते. घरचा असो की, सरकारचा, जनतेला कृष्णप्रकाश प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात हवेहवेसे वाटायचे. संत कबीरांच्या संंतवाणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव राहिला आहे. उर्दू गझलांची आवड, मुखोद्गत असणारी शेरोशायरी, याशिवाय जगभरातील विविध विचारवंतांचे तत्वज्ञानाचा अभ्यास असल्यामुळे त्यांच्या भाषणातून मौलिक विचारांचे उत्सर्जन व्हायचे. उच्चांक गाठलेली लोकप्रियता कृष्णप्रकाश यांच्या वाट्याला आली. अनेक तरूणांचे आदर्श आणि प्रेरणास्थानी असलेले कृष्णप्रकाश यांचे उद्या, 21 जुलै रोजी बुलढाण्यात आगमन होत आहे.
बुलढाण्यातून अमरावती ग्रामिण एसपी म्हणून कृष्णप्रकाश यांची बदली झाली होती. तेथून सांगली याठिकाणी त्यांनी सेवा दिली. नंतर पुणे आणि मुंबई अशा दोन ठिकाणी त्यांची प्रशासकीय सेवा राहिली आहे. आता ते महाराष्ट्राचे अप्पर पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
गिनीजमध्ये नोंद
जर गुन्हेगारांवर कारवाईबाबत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पर्याय असता तर कृष्णप्रकाश यांचे नांव त्याहीठिकाणी आघाडीवर असते. पण कमालीचा उर्जावान असणार्‍या या अधिकार्‍याने रनिंग, सायकलिंग, स्विमींग या क्षेत्रामध्येही दैदीप्यमान कामगिरी करीत जगभरात आपल्या नावाचा डंका वाजविला आहे. ते एकमात्र असे पोलिस अधिकारी आहेत, ज्यांनी आयर्नमॅन ट्रायथलॉन स्पर्धेत आयर्नमॅनचा पुरस्कार प्राप्त केला आहे. या स्पर्धेत 16 ते 17 तासांत 3.8 किलोमिटर पोहणे, 180.2 किलोमिटर सायकल चालविणे आणि 42.2 किलोमिटर धावण्याचे लक्ष्य एकाचवेळी पूर्ण करायचे असते. याशिवाय अल्ट्रामॅन हा पुरस्कारही त्यांनी आपल्या नांवे केला. या स्पर्धेची काठिण्यपातळी ऐकाल तर थक्क व्हाल. या स्पर्धेत 10 किलोमिटर पोहणे, 84 किलोमिटर अल्ट्रा मॅराथॉन आणि 421 किलोमिटरची क्रॉस क्रंट्री बाईकिंग असते. एव्हढ्यावर कृष्णप्रकाश थांबले नाहीत. त्यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणीपर्यंतचे 5 तास 26 मिनीटांत कापले. जवळपास 16.20 किलोमिटर ते पोहले. ही अद्भुत कामगिरी करणारे कृष्णप्रकाश जगातील एकमेक व्यक्ती आणि पोलिस अधिकारी ठरले आहेत.

असा आहे एडीजी कृष्णप्रकाश यांचा बुलढाणा दौरा

आपल्या चार दिवसीय शासकीय दौर्‍यात ते बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे इन्स्पेक्शन करणार आहेत. उद्या, रविवार 21 जुलै रोजी पहाटे ते मुंबईहून शेगांव येथे पोहोचतील. त्यानंतर थेट खामगांव शासकीय विश्रामगृह येथे प्रस्थान करतील. खामगांव येथे ग्रीनॅथॉन या मॅरेथॉन स्पर्धेत ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. रविवारचा मुक्काम त्यांचा खामगांव येथील विश्राम गृहावर असेल. दूसर्‍या दिवशी, सोमवार 22 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता खामगांव पोलिस उपअधीक्षक कार्यालयाला ते भेट देतील. तर दुपारी 2.30 वा. खामगांव ग्रामिण पोलिस ठाण्याला त्यांची भेट राहील. बुलढाणा शहरात त्यांचे आगमन 23 जुलै रोजी होईल. सकाळी 10.30 वा. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला भेट, दुपारी 2.30 वा. मुख्यालयात ते क्राईम मिटींग घेणार आहेत. तर दुपारी 4 वाजता पोलिस उपअधीक्षक बुलढाणा कार्यालयास त्यांची भेट आयोजित आहे. यानंतर लगेच ते बुलढाणा ग्रामिण पोलिस स्टेशन येथे जावून पाहणी करतील. बुधवार, 24 जुलै रोजी सकाळी 9 वाजता परेड निरीक्षण, सकाळी 10.30 वा. वृंद परीक्षद, दुपारी 2 वा. वार्षिक निरीक्षण नोटिसचे वाचन असा अप्पर पोलिस महासंचालक कृष्णप्रकाश यांचा दौरा आहे. या शेवटच्या दिवशी सायंकाळी 6 वाजता बुलढाणा येथून शासकीय वाहनाने संभाजीनगरकडे रवाना होवून विमानाने मुंबईला प्रस्थान करतील.




148
17035 views