logo

...त्याने कटरने गळा कापून केलाहोता मित्राचा खून, मिळाली जन्मठेपेची शिक्षा!

मनमाड : पैसे व मोबाइल चोरण्याच्या उद्देशाने मित्रास दारू पाजून त्याचा खून करणा-यास मालेगाव येथील अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेसह ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नांदगाव, मनमाड व चांदवड तालुक्यात खळबळ उडवून देणारी ही घटना दि. १३ जानेवारी २०१७ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास मनमाड-भालूर रोडलगत सटाणे शिवारात घडली होती. या घटनेत तब्बल सात वर्षांनी आरोपीला शिक्षा झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की, महेंद्र निंबा सोनवणे (वय ३३, रा. वडनेर खा., ता. मालेगाव) व मयत भाऊसाहेब दशरथ चव्हाण (रा. धोडंबे) हे दोघे मित्र होते. महेंद्र यांने भाऊसाहेब याच्याकडील पैसे व मोबाइल फोन चोरण्याच्या उद्देशाने त्यास मनमाड येथे आणून दारू पाजली. रस्त्याने जाताना धारदार कटर विकत घेत प्रवासी रिक्षाने त्यास मनमाड जवळील कºही गावाजवळ सटाणे शिवारात कटरने भाऊसाहेब याचा गळा कापूा व दगडाने त्याचे तोंड ठेचून जिवे ठार मारले. याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात महेंद्र सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तपासी अंमलदार तथा सहायक निरीक्षक जी. आर. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अपर जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. यू. बघेले यांच्या न्यायालयात चाललेल्या या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील अनिल बागले व एस. के. सोनवणे यांनी सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. तर अ‍ॅड. एम. एस. फुलपगारे यांनी सरकार पक्षातर्फे आरोपीस शिक्षेसाठी युक्तिवाद केला. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी महेंद्र सोनवणे यास खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, दंड न भरल्यास दोन वर्षे करावासाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यातील पैरवी अधिकारी पोलीस शिपाई सर्जेराव सोनवणे व पोलीस हवालदार शिवाजीराव कापडणे यांनी न्यायालयीन कार्यवाहीसाठी मनमाड पोलीस ठाण्यातर्फे पाठपुरावा केला.

7
2564 views