logo

डॉ.प्रकाश भांगरथ दाखल केला कोकण पदवीधर निवडणुकीत उमेदवारी अर्ज


ठाणे ; येत्या 26 जून रोजी कोकण पदवीधर विधानपरिषद निवडणूक पार पडत असून काँग्रेसचे प्रांतिक सदस्य,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष ,सेवादल काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष डॉ.प्रकाश भांगरथ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाकडून त्यांनी उमेदवारी मागितली आहे.काँग्रेसने एबी फॉर्म न दिल्यास अपक्ष निवडणूक लढविण्याची भूमिका डॉ.भांगरथ यांनी ठेवली असल्याचे समजते,प्रदेश पातळीवर ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. प्रकाश भांगरथ यांची कोकण पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत एन्ट्री झाल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे.
डॉ.प्रकाश भांगरथ मागील दोन वर्षापासून विधानपरिषद निवडणुकीची तयारी करत आहेत.भिवंडी लोकसभा मतदारसंघातही त्यांनी उमेदवारीची मागणी केली होती पण सदर जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने त्यांनी कोकण पदवीधर निवडणूक साठी अर्ज दाखल केला आहे.काँग्रेसचे रमेश कीर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी ते रत्नागिरीचे असून सर्वात कमी मतदार नोंदणी रत्नागिरी जिल्ह्यात तर सर्वात जास्त मतदार नोंदणी ठाणे जिल्ह्यात झाल्याने भाजपचा पराभव करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याला संधी द्यावी अशी मागणी ठाणे पालघर,रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
डॉ.प्रकाश भांगरथ हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष असून कुणबी एकीकरण समितीचे सरचिटणीस आहेत शिवाय ते कोकण कृषी विद्यापीठ समिती सदस्य असून कोकणातील ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यातील पदवीधर व ओबीसी तरुणांशी त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे.शिवाय त्यांच्या हाताखाली शिकलेले अनेक तरुण शासकीय अधिकारी,कर्मचारी व मोठमोठ्या हुद्द्यांवर रुजू झाल्याने व ते मतदार असल्याने त्याचा मोठा फायदा भांगरथ यांना होणार आहे.गेल्या 25 वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून दहा वर्षापासून ओबीसी चळवळीचे ते काम करत आहेत.आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी विधानपरिषद जिंकली त्यांनी पदवीधर तरुणांसाठी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने भाजपचे विद्यमान आमदार व उमेदवार निरंजन डावखरे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी असून पदवीधर तरुणांसाठी व्हिजन घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेल्या डॉ.प्रकाश भांगरथ यांना चांगलीच संधी उपलब्ध होणार असल्याचे बोलले जाते.
दरम्यान डॉ. प्रकाश भांगरथ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून सामाजिक संघटनांचे अनेक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

57
16006 views