
निवडणूक खर्चात भूमरे अव्वल, खैरे दुसऱ्या क्रमांकावर
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिलेली असते. य
निवडणूक खर्चात भूमरे अव्वल, खैरे दुसऱ्या क्रमांकावर
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिलेली असते. या खर्चाची आयोगाकडून वेळोवेळी तपासणी देखील होते. त्या अनुषंगाने उमेदवारांनी केलेल्या खर्चाची दुसऱ्या टप्प्यातील तपासणी मंगळवारी (दि.७) पार पडली. यात शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी सर्वाधिक १७ लाख ७९ हजार २४१ रुपये खर्च केले आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना उबाठाचे चंद्रकांत खैरे यांनी ७ लाख १८ हजार ७२६ रुपये खर्च केले आहेत. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. २५ एप्रिलपर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले. उमेदवारांनी अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या रॅलीपासून 6 मे पर्यंत केलेल्या खर्चाचा हिशेब मंगळवारी (दि.७) खर्च कक्षाचे नोडल अधिकारी शेखर कुलकर्णी यांच्याकडे मांडण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांनी ६ लाख ६ हजार ०५६ रुपये, एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी ५ लाख ९५ हजार १३०, अपक्ष उमेदवार जीवन राजपूत यांनी ३ लाख ३४ हजार ८८५, अपक्ष जे.के. जाधव यांनी ५ लाख ७४ हजार ५१० रुपये, हर्षवर्धन जाधव यांनी २ लाख ८७ हजार ७११रुपये खर्च केल्याची माहिती नोडल अधिकारी कुलकर्णी यांना दिली आहे. यानंतर ११ मे रोजी देखील उमेदवारांना खर्च सादर करायचा आहे. मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी ६ दिवस बाकी आहेत. त्या अनुषंगाने स्टार प्रचारकांच्या सभा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या निवडणूक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.