logo

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यामधील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासन सज्ज

*मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज*

1 हजार 76 मतदान केंद्रांवर 7 हजार 719 कर्मचारी नियुक्त

चोख पोलीस बंदोबस्त, मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध

महेंद्र महाजन

वाशिम, दि.24 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 अंतर्गत दुस-या टप्प्यातील मतदानासाठी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया शुक्रवार दि.26 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने विविध माध्यमातून जनजागृती केली आहे. जिल्ह्यातील नव मतदार आणि महिलांनीही या लोकशाही उत्सवात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले मतदानाचे अधिकाराचे वापर करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.

जिल्ह्यात एकूण 9 लाख 79 हजार 237 मतदार आहेत. त्यापैकी 5 लाख 10 हजार 814 पुरुष, 4 लाख 68 हजार 407 महिला तर 16 तृतीयपंथीयांचा समावेश आहे. वाशिम जिल्ह्यातील 33-रिसोड हा विधानसभा मतदारसंघ 6-अकोला लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. तसेच 34-वाशिम आणि 35- कारंजा विधानसभा मतदारसंघ हे 14-यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतात. जिल्ह्यात एकूण 1 हजार 76 मतदान केंद्र असून त्यात महिला-3 दिव्यांग-3 युवा-3 आणि 63 आदर्श मतदान केंद्राचाही समावेश आहे.

या तिन्ही मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेत 7 हजार 719 अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्ती करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये 6 हजार 646 पुरुष व 1 हजार 73 महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

33-रिसोड मतदारसंघात 1 लाख 65 हजार 772 पुरुष मतदार 1 लाख 50 हजार 157 महिला असे एकूण तीन लाख 15 हजार 929 मतदार आहेत तसेच दिव्यांग मतदार 2 हजार 863 तर 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले मतदार 3 हजार 932 आहेत. रिसोड विधानसभा मतदार संघात एकूण 337 मतदान केंद्र आहेत. त्यात महिला-1 दिव्यांग-1 युवा-1 आणि आदर्श-1 मतदान केंद्राचाही समावेश आहे.

वाशिम विधानसभा मतदारसंघात 386 मतदान केंद्र आहेत. त्यात महिला-1 दिव्यांग-1 युवा-1 आणि आदर्श-1 मतदान केंद्राचाही समावेश आहे. 356,572 एकूण मतदारांपैकी 1 लाख 86 हजार 207 पुरुष आणि 1 लाख 70 हजार 357 महिला मतदार आहेत तसेच आठ तृतीय पंथी मतदारही आपले मत अधिकार वापरतील. 2923 दिव्यांग मतदार आणि 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले 5438 मतदारांचाही यात समावेश आहे.

35 कारंजा विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 6 हजार 736 मतदार असून 1 लाख 58 हजार 835 पुरुष 1 लाख 47 हजार 893 महिला व आठ तृतीयपंथी मतदार आपल्या मताधिकाराचे वापर 353 मतदान केंद्रांवर करतील

उपरोक्त मतदान केंद्रांपैकी एकूण 540 मतदान केंद्रांवर लाईव्ह कास्टिंग करण्यात येणार आहे मतदान केंद्रांवर सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे या निवडणुकीमध्ये मतदारांना त्यांचे नाव मतदार यादी मध्ये नाव मतदान केंद्र ही तपशील शोधण्याकरिता टोल फ्री क्रमांक 1950 उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच तिन्ही मतदारसंघाचे तसेच तहसील स्तरावर मतदार मदतनीस कक्ष स्थापन करण्यात आला आहे मतदारांना 24 एप्रिल पर्यंत 91.78 वोटर स्लिप वाटप करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक अनुज तारे यांनी कळविले आहे. नाशिक, छत्रपती संभाजी नगर, पुणे ग्रामीण, गोंदिया, सोलापूर, अहमदनगर, सीआयएसएफ आणि केरळ येथून बंदोबस्तासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यत आला आहे. एक जिल्हा पोलीस अधीक्षक, एक जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एक पोलीस उपधीक्षक, 17 पोलीस निरीक्षक,103 सहायक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक,1 हजार 760 पोलीस कॉन्सटेबल, 1 हजार 150 होमगार्ड तसेच सीआयएसएफ आणि केरळ एसाआरपी कडून कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात येणार.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून काम करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस यांनी दिले आहेत.

31
5213 views