इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी आर्ज दाखल केले
नांदेड दि. १ : सोमवारी १६-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आणखी दोन अर्ज दाखल झाले आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र केशव पोपळाईतकर यांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज सोमवारी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या गुरुवारी एक, शानिवारी दोन तर आज सोमवारी दोन असे एकूण आतापर्यंत ५ अर्ज दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत १०८ अर्जाची उचल झाली आहे.४ एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे.
आतापर्यंत इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव बळवंतराव चव्हाण, अपक्ष म्हणून महारुद्र केशव पोपळाईतकर, अकबर अख्तर खॉन, साहेबराव भिवा गजभारे, जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण यांनी अर्ज दाखल केला आहे.
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे. २८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उद्यापासून पुढील ३ दिवस अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. ८ तारखेला अंतिम उमेदवार निश्चित होईल.