logo

पालिकेने ४५ लाखांची थकबाकी भरली नाही; निलंगा पाणीपुरवठा योजनेला टाळे !

निम्न तेरणा धरण व जलाशय उपसा सिंचन प्रकल्प माकणी या विभागांनी निलंगा पालिकेकडे ४५ लाख रुपये थकबाकी असल्याने पाणीपुरवठा उपसा करणाऱ्या ठिकाणी टाळे ठोकले आहे. त्यामुळे मागील पाच दिवसापासून निलंगा शहराचा पाणीपुरवठा बंद असून, शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे.
दरम्यान, होळीच्या सणाला पाणीटंचाईचा सामना निलंगा शहरातील नागरिकांना करावा लागत आहे.

निलंगा शहराला माकणी धरणातून ४० किलोमीटर पाईपलाईन अंथरून माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाणीपुरवठा सुरू केला. त्यानंतर पंचवीस वर्षांनी माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या पाईपलाईनचे नूतनीकरण केले व पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न केला. मात्र या पाणीपुरवठा पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात दोष असून नेहमीच पाणीपुरवठा यंत्रणा विस्कळीत होते. कधी लाईट बिल न भरल्यामुळे तर कधी तांत्रिक बिघाडामुळे बंद असते. आता तर चक्क लोअर तेरणा विभागाने ४५ लाख पाणीपट्टी थकीत असल्यामुळे माकणी येथील पाणीपुरवठा यंत्रणेलाच टाळे ठोकले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची पळापळ चालू झाली व नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी व माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी माकणी धरण येथे जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली. सध्या रमजान व होळीच्या सण असल्यामुळे पाणीपुरवठा चालू करू द्या अशी विनंती केली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी ४५ लाखापैकी ५० टक्के रक्कम भरली तरच पाणीपुरवठा चालू होईल अन्यथा नाही अशी भूमिका घेतल्यामुळे पाणीपुरवठा यंत्रणा अडचणीत आली आहे.

तीन दिवस सुट्टी असल्याने पालिकेसमोर पेच...
शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस कार्यालयीन सुट्टी असल्यामुळे एवढ्या पैशाची जुळवाजुळव करायची कशी हा पेच पालिका यंत्रणेसमोर आहे. धरणात पाणी आहे, पाणीपुरवठा योजना नवीन कार्यान्वित केलेली आहे. मात्र केवळ नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे कधी लाईट बिल थकीत, तर कधी तांत्रिक दोष, तर कधी पाणीपट्टीमुळे या कृत्रिम टंचाईमुळे निलंगा शहरवासियांना ऐन उन्हाळ्यात तसेच होळीच्या सणानिमित्त पाण्यासाठी घागरी घेऊन वन-वन फिरावे लागत असल्याचे चित्र आहे.

नोटिसा देऊनही थकबाकी भरली नाही...
निम्न तेरणा धरण व जलाशय उपसा सिंचन शाखा माकणीचे अभियंता कृष्णा येणगे म्हणाले, ४५ लाख रुपये निलंगा नगरपालिकेकडे थकबाकी आहे. यापूर्वी त्यांना दहा ते पंधरा वेळेस नोटीसा देऊनही ते बाकी भरायला तयार नाहीत. त्यामुळे शेवटी हा निर्णय वरिष्ठांच्या सांगण्यावरून घेण्यात आला आहे. थकीत बिलाचा भरणा करावा अशा सुचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार यंत्रणा बंद करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
जन जन की आवाज सोशल मीडिया
रिपोर्ट शिवाजी श्रीमंगले.

22
1764 views