
बिलीफ्स संस्थेच्या वतीने ग्रामविकास कार्यात सहभागी महिलांचा सन्मान सोहळा.
त्र्यंबकेश्वर, ५ मार्च २०२४: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील निरगुड पाडा येथे उपजीविका, शिक्षण आणी आरोग्य या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नाशिक स्थित बेटर लाईव्हलीहूड अँड एज्युकेशन थ्रू फंडामेंटल स्टडीज अर्थात बिलीफ्स सामजिक संस्थेद्वारे आयोजित महिला मेळावा हा महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकासासाठी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम ठरला. संस्थेच्या या मेळाव्यात सुमारे १०० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेऊन विविध कार्यक्रमांचा आनंद घेतला.
मंगळवार ५ मार्च २०२४ रोजी घेण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये बिलीफ्स संस्थेच्या ग्रामविकास कार्यात उल्लेखनीय सहभाग नोंदविणाऱ्या ५ महिलांचा सन्मान चिन्ह व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. या सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलेल्या महिलांमध्ये रखमाबाई दगडू आव्हाटे (रोजगार हमी कायदा ), मंजुळाबाई काळू निरगुडे (अन्नसुरक्षा कायदा), यशोदा नरेश निरगुडे (आरोग्य अधिकार ),सोनुबाई चंदर निरगुडे (पौष्टिक तृणधान्य बिजोत्पादन) आणि रिंकू निरगुडे (महिला संघटन व महिला अधिकार ) यांना सन्मानित करण्यात आले.
ग्रामविकास कार्यात सहभागी स्थानिक महिला सन्मान सोहळ्यानिमित्त घेण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये विविध मनोरंजक खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. लिंबू चमचा, सुईदोरा ओवणे, प्लास्टिक बॉल, संगीत खुर्ची अशा खेळांमध्ये महिलांनी उत्साहाने भाग घेतला. तसेच, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते, ज्यामध्ये महिलांनी विविध लोकगीते सादर केले.मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या खेळांच्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या महिलांना सुवर्ण पदक, रजत पदक आणि कास्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
मेळाव्याचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव श्रीमती वैशाली ताई यांनी केले. त्यानंतर संस्थेचे कार्य आणि उद्देश याबद्दल रिंकू निरगुडे यांनी सविस्तर माहिती दिली. ग्रामविकास म्हणजे काय, त्यात महिलांचे योगदान आणि महत्व तसेच ग्रामविकासासाठी पूरक ठरणारे कायदे याची माहिती संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी उपस्थित महिलांना दिली. मेळाव्याच्या समारोपाच्या वेळी स्थानिक महिलांनी वर्षभरात संस्थेच्या बरोबर ग्रामीण विकासाचे कार्यक्रम राबविताना आलेले आपले संघर्षमय अनुभव कथन केले. यातून महिलांमध्ये निर्माण झालेले आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल दिसून आला. स्थानिक ग्रामस्थांनी मेळाव्यासाठी स्वयंस्फुर्तीने सहभाग देऊन त्याला यशस्वी बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या मेळाव्याप्रसंगी अंगणवाडी ताई श्रीमती अनिता कर्पे मॅडम व उपसरपंच श्रीमती जनाताई पिंगळे या मान्यवरांनी व्यासपीठावरून उपस्थित सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले.