
माढा व हातकणंगले लोकसभेवर शेकापचा दावा
माढा व हातकणंगले लोकसभेवर शेकापचा दावा
सांगोला - राज्यातील माढा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची इंडिया आघाडीकडे शेकापने मागणी केली आहे. येथील लोकांच्या मनात काय आहे हे मला माहित आहे. शेकापचा कार्यकर्ता जिद्दी असून निष्ठा ठेवणारा आहे.जय पराजय होत असतो, परंतु आम्ही सन्मान सोडत नाही. शेकापचा मतदारसंघात जो सन्मान आहे तो पुढच्या पिढीने चालविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.
सांगोला येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शेतकरी कामगार पक्षातर्फे सोमवार (ता. 11) रोजी शेतकरी मेळावा झाला. यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे आमदार रोहित पवार, रतनबाई देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड, बाबुराव गायकवाड अभिषेक कांबळे, शिवसेनेचे सूर्यकांत घाडगे, तुषार इंगळे, सुरज बनसोडे, दत्तात्रय टापरे, वैभव केदार यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील मेळाव्यास मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, रोहित पवार यांनी प्रथम पंचवीस वर्ष व्यावसाय केला व त्यानंतर ते आमदार झाले जनतेला कळले पाहिजे. शेकापमुळे रामदास आठवले हे खासदार झाले परंतु भाजपामध्ये जाऊन त्यांनी विचाराला तिलांजली दिली अशी खंत व्यक्त केली.
शेकापमध्ये मतभेद असले तरी पक्षात लोकशाही आहे. तुमच्या मनात काय आहे हे मला माहित आहे, तुमच्या मनाचा आदर मी नक्कीच करणार आहे. परंतु आताच मी उमेदवारीची घोषणा करणार नाही तर इंडिया आघाडीची जागावाटपणानंतर तुमच्या मनातील व्यक्तीचा मी निश्चितपणे आदर करेन. यावेळी दत्ता टापरे, सुरज बनसोडे, डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
प्रस्ताविक विनायक कुलकर्णी यांनी केले. या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार जयंत पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख यांची खुल्या वाहनांमधून काढण्यात आलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.
जनताच तुमचा हिशोब करेल - डॉ. बाबासाहेब देशमुख
स्व. आबासाहेबांचे (गणपतराव देशमुख) यांचे कार्य आज सांगण्याची गरज नाही. त्यांनी केलेल्या कामावर, विचारावरच शेकाप पक्ष पुढे जात आहे. कोणाचे पार्सल कुठे पटवायचे हे जनताच ठरवेल. आज कोणी, किती, काय काम केले हे मी सांगणार नाही. मी पक्षाच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता असून जनताच तुमचा निश्चितपणे हिशोब करेल असे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बोलून दाखवले.
मेळाव्याला विरोध दर्शविणारे डॉ. अनिकेत देशमुख व्यासपीठावर -
शेकापने आयोजित केलेल्या या शेतकरी मेळाव्यास अगोदरच या मेळाव्यासाठी माझा विरोध असल्याचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी सोशल मीडियातून जाहीर केले होते. विरोध केला असला तरी या मेळाव्यास डॉ. अनिकेत देशमुख यांनी उपस्थिती लावून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. डॉ. अनिकेत देशमुख यांच्या भाषणामध्येच उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नावाने मोठी घोषणाबाजीही केली.