पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर येथे ‘इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा
पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर येथे ‘इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा निरोपाचा क्षण नाही; शुभेच्छांचा सण आहे पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारं मन आहे !’ पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके, इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी आणि इयत्ता दहावीचे सर्व विषय शिक्षक यांच्या आगमनाने दहावीच्या विद्यार्थ्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके, विशाल मेंढे, श्रावणी कामुजू, वैशाली वाघ आणि इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यालयातील संगीत शिक्षकांनी गायलेल्या सुमधुर गीताने सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे डोळे पानावले. त्यामध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शालेय जीवनाची आठवण कायमस्वरूपी स्मरणात राहावी याकरिता उत्कृष्ट नाटिकेचे सादरीकरण केले होते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आपल्या शिक्षकांबद्दलचे प्रेम अतिशय भावुकतेने व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या बहुमूल्य शब्दाने विद्यालयाचे प्रांगण अतिशय भावूक झाले होते. इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व एक छोटीशी आठवण म्हणून भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट नृत्य हे कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके यांनी आपल्या मनोगतातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि परीक्षेसाठी बहुमोल मार्गदर्शन देखील केले. त्याचबरोबर काही विषय शिक्षकांनी आपल्या मनोगतातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्यांच्या परीक्षेसाठी शुभ आशीर्वाद देखील दिले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील भविष्यात पदार्पण करण्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरून झळकत होता त्याचबरोबर विद्यालय सोडून जाण्याची खंत देखील त्यांच्या मनाला जाणवत होती आणि ती त्यांनी व्यक्त देखील करून दाखवली. अशा या निरोप समारंभाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीचे विद्यार्थी ध्रुव सुराणा आणि ओवी ठाकरे यांनी पार पाडले. विद्यार्थी रिषभ शिंदे याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुंदर अशा ओळी प्रस्तुत केल्या. निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे सर्व आयोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले. विद्यालयाच्या समन्वयक शिक्षिका वैशाली वाघ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या सर्व कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.