मीरागावातील रस्त्याचे रखडले काम !! नागरिकांचे झाले हाल !!
मुंबई मधील पश्चिम रेल्वेच्या उपनगरांपैकी एक असलेल्या आणि ठाणे जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या मीरारोड स्थित मीरागाव मधील मुख्य रस्त्याच्या काॅंक्रीटीकरणाचे गतवर्षी सुरू झालेले काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. या अपूर्णं कामामुळे पादचारी आणि वाहनचालकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अवकाळी पाऊस पडल्यास रस्त्याची परिस्थिति आणखीनच बिकट होते. त्यामुळे मीरागावातील रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार ? असा प्रश्न मीरागावातील त्रस्त नागरीक आणि ग्रामस्थ विचारत आहेत.गेल्या काही वर्षापासून रखडलेले पश्चिम द्रुतगति मार्गावरील अमर पॅलेस हाॅटेल ते हनुमान मंदिर आणि मुंशी कंम्पाऊंड या अंदाजे ४०० ते ५०० मी. अंतराच्या मीरागावातील मुख्य रस्त्याच्या काॅंक्रिटीकरणाचे काम स्थानिक लोकप्रतिनिधि यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे २०२३ वर्षाच्या मध्यात सुरु करण्यात आले. मिरा भाईंदर महानगरपालिके तर्फे रितसर निविदा काढून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. हा रस्ता वर्दळीचा असल्याकारणाने काॅंक्रिटीकरणाच्या कामाची विभागणी विविध टप्प्यात करण्यात आली.परंतु अद्याप काही टप्प्यातील रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. दुरुस्त न झालेला रस्त्याचा काही भाग खड्डेमय झाला आहे. मुख्यत्वे दुचाकी चालकांना या रस्त्यामधून आपले वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच नादुरूस्त रस्त्यावरील खडी उखडल्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार सर्रांस घडत आहेत. काॅंक्रिटीकरण कामामध्ये वापरलेले दगड़ आणि खडी रस्त्याच्या दुतर्फां तसेच पडून राहिल्यामुळे सामान्य नागरिकांना पायी चालताना त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांना पाय अडकून खाली पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मीरागावातील हा मुख्य रस्ता पश्चिम द्रुतगति मार्गाशी थेट जोडला जात असल्यामुळे या रस्त्यावर पादचारी आणि वाहनांची सतत वर्दळ असते, त्यामुळे एखादा अपघात होण्यापूर्वी तातडीने रस्त्याच्या काॅंक्रिटीकरणाचे काम पूर्ण होण्याची नितांत गरज आहे. म्हणूनच महापालिका प्रशासनाने तथा सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याच्या काॅंक्रिटीकरणाचे काम जलदगतीने येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फां जागेचे सपाटीकरण करुन त्यावर पेव्हर ब्लॉक बसवून नागरिकांसाठी पदपथ बनवून देण्याची इच्छा मीरागावातील नागरिक व्यक्त करत आहेत.