तुम्हाला माहीत आहे का? पेट्रोल-डिझेललाही एक्सपायरी डेट असते! जाणून घ्या वाहन बंद ठेवल्यावर किती दिवसांत इंधन खराब होतं?
पेट्रोलची एक्सपायरी डेट असते असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे की इतर वस्तूंप्रमाणे पंपावरून खरेदी केलेलं पेट्रोल आणि डिझेलचा वापर करण्यासाठी मर्यादित कालावधी असतो. कारण वाहनाच्या टाकीत भरलेलं पेट्रोल काही महिन्यांत खराब होतं. हे खराब इंधन वापरलं तर सर्वात आधी वाहनाच्या मायलेजवर परिणाम होतो आणि नंतर वाहनाचं इंजिन खराब होऊ शकतं.पेट्रोल किंवा डिझेल एखाद्या सीलबंद कंटेनरमध्ये भरून 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात ठेवल्यास ते सहा महिने ते एक वर्ष टिकू शकतं. परंतु, तेच पेट्रोल वाहनाच्या टाकीत भरलेलं असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन महिने इतकंच असतं. इंधन सीलबंद कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं असेल आणि बाहेरचं तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर त्या पेट्रोलचं आयुष्य केवळ तीन महिने इतकंच असतं.तसेच इंधन हे वाहनाच्या टाकीत भरून ठेवलेलं असेल आणि आसपासचं तापमान हे 30 अंश किंवा त्याहून अधिक असेल तर त्या इंधनाचं आयुष्य एका महिन्याहून कमी असतं. डिझेलचं आयुष्यदेखील पेट्रोलसारखंच असतं. तसेच डिझेल सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ टाकीत किंवा कंटेनमध्ये साठवून ठेवलं तर ते घट्ट आणि चिकट होतं. ज्यामुळे वाहनाचं इंजिन खराब होऊ शकतं. त्यामुळे वाहनाच्या टाकीत एक महिन्यापेक्षा जास्त काळ पेट्रोल किंवा डिझेल साठवून ठेवू नये.