अनधिकृत बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने?
नांदेड (प्रतिनिधी)- शहरात अनधिकृत बांधकामाचे मजल्यावर मजले चढत असताना महानगरपालिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. अनधिकृत बांधकाम थांबवण्या ऐवजी केवळ कागदोपत्री खेळ सुरु आहे. आणि इकडे अनधिकृत बांधकाम पाच पाच मजल्यांपर्यंत उभे झाले आहेत. मग यास आशीर्वाद कोणाचा, कोणाचे खिसे गरम होत आहेत? असा सवाल उपस्थित होतो. सुरवातीला बांधकाम पूर्ण होऊ द्यायचे आणि नंतर नोटीसा बाजावायाच्या हे चोर पोलिसाचा खेळ खेळण्यात धन्यता मानणार्या महानगरपालिकेने ठोस कार्यवाही करणे गरजेचे आहे जनेकरून भविष्यात कोणीही अनधिकृत बांधकाम करणार नाही.
आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हे अत्यंत शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात त्यांनी त्यांच्या काळात कर्मचार्याना शिस्तीचे धडे दिले, शहरात अनधिकृत होर्डिंग्ज वर शिस्त लावली पण ज्यात जास्त महसूल मिळतो, शहराचे आरोग्य, सौंदर्य अवलंबून आहे अश्या अनधिकृत बांधकामावर अजूनतरी पूर्णतः अंकुश लावता आला नाही असे म्हणता येईल.
शहरातील बाबानगर जवळ असलेल्या जवाहर नगर येथे सुरु असलेल्या सखाराम राठोड यांच्या अनधिकृत बांधकामावर कार्यवाही करावी अशी मागणी दि. १७ एप्रिल २०२३ रोजी जवाहरनगर येथील अनेक प्रतिष्टीत नागरिकांनी आयुक्तांकडे केली होती. तक्रार करून सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला तरी महानगरपालिकेला बांधकाम थांबवता आले नाही. या बांधकामाने पाचवा मजला गाठला. ते कोणाच्या आशीर्वादाने? असा प्रश्न निर्माण होतो.
बांधकाम करताना काही नियमांचे पालन झाले पाहिजे ते होत आहे का? बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकून सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणाऱ्या धन धांडग्या लोकांवर कधी कार्यवाही होईल? महानगरपालिकेचे नियम केवळ गोर गरीब लोकांसाठीच आहेत का? अतिक्रम विभाग रस्त्यावरील छोट्या छोट्या दुकानदारांचे अतिक्रम हटवण्यासाठी जी तत्परता दाखवते, ताकद लावते ती इथे लावणार का? असा प्रश्न उपस्थित करत सदरील बांधकाम त्वरित थांबवून त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी जवाहरनगर बाबानगर येथील नागरिकांनी केली आहे.