
Dombivli Crime News : दोघा भावांनी आदिवासींचा गैरफायदा घेत शासकीय योजना घातल्या खिशात
खोणी गावातील कातकरी आदिवासी समाजातील 6 जणांचा गावातीलच दोघा भावांनी फसवणूक करत त्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ स्वतःच्या खिशात घातल्याची घटना उघडकीस आली आहे.तसेच हे दोघे भाऊ आदिवासींना कोणताही मोबदला न देता त्यांच्याकडून मजुरी करुन घेत होते, त्यांनी काम न केल्यास त्यांना मारहाण केल्याचेही समोर आले असून याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात विजय शालीक पाटील (वय 45) व संजय शालीक पाटील (वय 40) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र या प्रकरणात अधिकारी वर्गाची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खोणीगावात तक्रारदार अशोक वाघे (वय 50) हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्नी सूमन हिच्यासोबत सासरी राहत आहेत. तसेच त्यांच्या बाजूलाच सुनिल शांताराम वाघे, सुंदरी शंकर वाघे,
अंकिता शंकर वाघे, सुनिता अनिल वाघे हे आदिवासी बांधव देखील रहातात. या कातकरी आदिवासींकडून याच गावात राहणारे विजय व संजय यांनी फसवणूक केली आहे. अशोक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संजय व विजय यांनी या आदिवासींना शासकीय योजनेतून घरे बांधून दिली आहेत.
ही घरे त्यांच्या जमिनीवर असून त्यांच्यामुळे त्यांना ही घरे बांधून मिळाल्याचे सांगत त्या बदल्यात दरवर्षी त्यांच्याकडून शेतीचे सर्व कामे जसे की भात लागवड, कापणी, झाडणी, मळणी व इतर कामे करुन घेत असत.
आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना कोणताही मोबदला न देत गेल्या 10 वर्षापासून त्यांच्याकडून ही कामे करुन घेतली जात आहेत. तसेच अशोक यांच्या नावे शासकीय योजनेच्या लाभ रक्कमेतून घेण्यात आलेल्या बकऱ्या (शेळ्या) या आरोपीत यांनी बाहेरून विकत घेऊन फिर्यादीस दिलेल्या आहेत,असे फिर्यादी व त्याच्या पत्नीस सांगुन बकऱ्यांमध्ये आपण भागीदार आहोत असे सांगुन त्या बकऱ्या स्वतःच्या गोठयात ठेवून त्या रानात चारण्याचे काम फिर्यादी याचेकडुन सक्तीने करून घेऊन त्या बकन्यांमधुन दरवर्षी तयार होणारे बोकड / बकऱ्या स्वत: विकुन त्यापैकी फिर्यादीला कोणतीही रक्कम न देता,
जबरदस्तीने बकराच्या चारण्याचे काम करवून घेतो. गेल्या सुमारे १० वर्षापासुन फिर्यादी व वाडीतील इतर आदिवासी कातकऱ्यांना हे दोघे भाऊ त्यांच्याकडे काम असेल तर दुसऱ्या कोणाकडे कामाला जाऊ देत नाहीत.
हे कामावर गेल्यास तुमच्या घरासाठी दिलेल्या जागेचे व घरांचे पैसे अजून फिटलेले नाहीत. तुम्हाला माझ्याकडेच काम करावे लागेल असे सांगत. त्यांनी काम न केल्यास त्यांना मारहाण करीत असत. तसेच त्यांची सर्व कागदपत्रे रेशनकार्ड, बॅकं पासबुक हे या भावांनी स्वतःकडे ठेवून घेतली आहेत असे म्हटले आहे.याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात 3 डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी विजय व संजय यांना अटक केली आहे. याप्रकरणी डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे म्हणाले, आरोपी अटकेत असून त्यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 11 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींची चौकशी सुरु असून अधिक तपास केला जात आहे.शुक्रवारी राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी घटनास्थळी जात या कातकरी आदिवासींची तसेच ग्रामपंचायत सरपंच, अधिकारी वर्ग सर्वांची भेट घेत चर्चा केली.
यावेळी आदिवासींकडून त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यांना कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेता येईल याची माहिती दिली. तसेच देण्यात आलेल्या योजना कोणत्या शासकीय नियमाप्रमाणे त्या देण्यात आल्या आहेत का ?
शासकीय योजना लाभांचे त्यांना वाटप झाले आहे का ? याची माहिती घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान यामध्ये आदिवासींची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच अधिकारी वर्गाची देखील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.