
तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून रागाच्या भरात तरुणाने ७ वाहने जाळून टाकल्याची घटना नाशिक मधील काठे गल्लीत घडली. भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना ताब्यात घेतले आहे
नाशिक :- तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून रागाच्या भरात तरुणाने ७ वाहने जाळून टाकल्याची घटना नाशिक मधील काठे गल्लीत घडली. भद्रकाली पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना ताब्यात घेतले आहे.
तरुणाने व त्याच्या मित्राने चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा सात वाहनांची जाळपोळकरत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाहने जळून मोठे नुकसान झाले आहे.
तरुणीशी ओळख असलेल्या संशयित सुमित पगारे (रा. धम्मनगर कथडा) याने तरुणीशी ओळख वाढवून संबंध प्रस्थापित करून विवाह करण्याची मागणी केली. तरुणीने त्यास नकार दिला. संशयिताने राग मनात धरून काल त्याचा मित्र संशयित विकी जावरे (रा.काठे गल्ली) याच्या मदतीने तरुणीच्या दुचाकीसह अन्य दुचाकी चारचाकी आणि रिक्षाची जाळपोळ करून नुकसान केले.
तत्पूर्वी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तरुणीचा भाऊ त्यांच्या अपार्टमेंटच्या बाहेर बसलेला असताना त्यास मारहाण केली. त्यानंतर रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा त्याठिकाणी येऊन वाहनांवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळपोळ केली. आरडा ओरड झाल्याने अपार्टमेंटच्या खाली येऊन पाहिले. वाहने जळत असल्याचे आढळून आली. स्थानिक रहिवाशांनी पाण्याचा मारा करत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बहुतांशी वाहने जळून राख झाली होती. घटनेनंतर अपार्टमेंटच्या पार्किंगमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात दोघे संशयित आढळून आले.
या प्रकरणी दोघांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. पोलीस अधिक तपास करत आहे.