
तुमचं आरोग्य, तुमच्या हातांत...
तुमचं आरोग्य तुमच्या हातांत असतं, तुमच्या शरीरात असतं, तुमच्या मनात असतं. तुमच्या खाण्यापिण्यावर तुमच्या जगण्या-वागण्यावर, तुमच्या विचार-भावनांवर अवलंबून असतं.
आरोग्य ही आपली नैसर्गिक अवस्था असते. ती जपावी, जोपासावी लागते. डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांपैकी ९५% रुग्णांच्या आजाराचं मूळ त्यांच्या सदोष जीवनशैलीत असतं, हा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे. योग्य जीवनशैली असेल (म्हणजेच समतोल आहार, नियमित व्यायाम, मानसिक संतुलन व पुरेशी विश्रांती) तर छोटेछोटेच नव्हे तर ज्याचा बहुतेकांना धसका वाटत असतो, असे गंभीर आजार/दुखणी म्हणजेच रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार हेसुद्धा टाळता येतात, किमानपक्षी आटोक्यात ठेवता येतात.
Prevention is better than cure.
कुठल्याही दुखण्यावरचा सर्वात चांगला उपाय म्हणजे प्रतिबंध.
आपल्याला काय सोसतं, काय नाही, कशामुळे नेमका कसा आणि काय हे समजून-उमजून वागलं तर छोटी मोठी दुखणी ही नेमकी कशामुळे हे आपणच शोधू शकतो व टाळू शकतो.
साधं डोकं दुखणं घ्या. बरीचशी डोकेदुखी मानसिक असते, हे आपण पाहिलंच, पण तिला असंख्य साधीसाधी निमित्तंही पुरतात. कुणाचं उन्हात हिंडल्यामुळे डोक दुखतं. कुणाचं कानांना वारा लागल्यामुळे दुखतं, कुणाचं 'चायनीज खाल्ल्यामुळे दुखतं. कुणाचं चॉकलेट खाऊन दुखतं. कुणाचं खोकल्यामुळे दुखतं, तर कुणाचं म्हणे खाली वाकल्यानं दुखतं. ढेकणाच्या औषधाचा वास सहन न झाल्यानं डोकं दुखणं आपण समजू शकतो; पण एखाद्या स्त्रीचं मोगऱ्याच्या वासानं डोकं उठतं, त्याचं काय करणार? कुठला डॉक्टर सांगेल, 'बाई गं, डोकं दुखतंय का, मग डोक्यावर मोगरा मालू नकोस!'
अलर्जी हा तर यापेक्षाही गमतीचा प्रकार आहे.
जगात अब्जावधी माणसं आहेत आणि लक्षावधी गोष्टी आहेत. कुणाला कशाची अॅलर्जी असेल, याचा काहीच भरवसा नसतो. आपणच आपल्या अॅलर्जीचं कारण नेमकं शोधू शकतो. (डॉक्टरांकडे काही तंत्र असतात. पण त्याला मर्यादा असतात, खूपच 'ट्रायल / एरर' करावं लागतं.)
चॉकलेटस् माझा आवडता पदार्थ पण सुकामेवा घातलेली अमेरिकन चॉकलेटस् - तीही फ्रीजमधून काढून लगेच खाल्ली की, मला सटासट शिंका येतात व माझे डोळे सुजतात.
हरभऱ्याची गड्डी खाऊन फस्त केली व हात चटकन घुतले नाहीत, तर माझे डोळे चुरचुरतात व जरा चोळले की, बेडकासारखे टपोरे सुजतात. हे मलाही अनेक वर्षांनी कळू शकलं.
ओशोना तर सुगंधाची अॅलर्जी होती. त्यांच्या दोन शिष्या प्रवचनाच्या वेळी दाराशी उभ्या राहत. येणाऱ्या प्रत्येकाला हुंगत. छान वास आला की, हाकलून देत.
काहीना धुळीची, काहींना उन्हाची अॅलर्जी असते.
देव अशा माणसांना भारतासारख्या देशात का जन्माला घालतो, कळत नाही. तात्पर्य काय, व्यक्ती तितक्या प्रकृती. तेव्हा आपापल्या प्रकृतीची नेमकी ओळख आपणच करून घ्यायची असते व ती जपायची असते.
सादर: डॉ.दिपेश पष्टे
ध्यानतज्ञ व समुपदेशक/मानसोपचार तज्ञ
9158498909/8483901049
©शिवराज गोर्ले