
कोरोनामुळे पिंपरीतील कलापुरे कुटुंबतील तीन सख्ख्या भावांचा नऊ दिवसांत मृत्यू
पिंपरी, दि. १८ .– नात्याच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात, हे खरे वाटते. पिंपरीतील खराळवाडीच्या कलापुरे कुटुंबाबाबत तेच घडले. रक्ताची नात्यातील जीवाभावाचे सख्खे तीन भाऊ. एकाला न्युमोनिया झाला म्हणून रुग्णालयात दाखल केले. तोच दुसरे दोघेही एकदम खचून गेले. अवघ्या नऊ दिवसांत एका पाठोपाठ एक असे तिघेही स्वर्गवासी झाले. ब्रम्हा,विष्णू, महेश अशी या तिघा भावांची ओळख ती. एकत्र कुटुंबाचा आदर्श असलेल्या या त्रिमुर्तीचे कोरोनामुळे निधन झाले. तिघांचाही दशक्रीया विधी शुक्रवारी एकत्रच पार पडला. पिंपरी चिंचवडकरांना चुटपूट लावणारी ही घटना आहे.
महापालिका भवनाजवळील खराळवाडीमध्ये लहानाचे मोठे झालेले कलापुरे खांदान. सर्वांत धाकटे दिलीप धर्माची कलापुरे (वय६१) यांना अशक्तपणा वाटला म्हणून लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांना न्युमोनिया झाला आणि पुढे तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.१० जुलै रोजी त्यांचे निधन झाले. परिवार त्या दुखून सावरतो नाही तोच थोरले भाऊ पोपट यांना थकवा आला म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. १२ जुलै रोजी त्यांनाही देवाज्ञा झाली. त्यांचेही निदान कोरोना असेच आले. दोघा भावांच्या अचानक जाण्याचा जबरदस्त धक्का बसलेल्या ज्ञानोबा कलापुरे यांनाही ते सहन झाले नाही. ते खचले आणि त्यांनाही दवाखान्यात ठेवण्याची वेळ आली. कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलेला असताना १७ जुलै रोजी ज्ञानोबा सुध्दा बंधूच्या मागोमाग अनंतात विलिन झाले. लहानपनापासून एकत्र खेळले, वाढले, प्रपंच केला.सुख दुखांचे अनेक प्रसंग आले पण कधीही एकमेकांना अंतर दिले नाही. आयुष्याचा शेवटसुध्दा अगदी एक दुसऱ्याच्या संमतीने संगतीने झाला. ४०-५० वर्षांपासून एक आदर्श एकत्र कुटुंब असलेल्या कलाटे बंधुचा अंत हा चर्चेचा विषय झाला आहे.