वाळूमाफियांचा हैदोस,
जळगाव :
गेल्या आठवड्यात ग्रामस्थ आणि वाळू तालुक्यातील दापोरा येथे माफियांमध्ये झालेल्या संघर्षाची घटना ताजी असतानाच आता जळगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रात वाळू माफियांचा बेबंदशाही कारभार चव्हाट्यावर आला आहे. वाळू माफियांनी नदीपात्रात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृत वाळू उपसा राजरोसपणे सुरू आहे.
खेडी, वडनगरी आणि फुपनगरी या तिन्ही गावांमध्ये वाळू माफियांनी चक्क पोकलेन आणि जेसीबीसारख्या जड यंत्रसामग्रीचा वापर करून वाळू उपसा चालवला आहे. विशेष बाब म्हणजे, या तिन्ही गावांपैकी एकाही गावाला शासनाकडून अधिकृत वाळू ठेका देण्यात आलेला - नाही. तरीही, केवळ रात्रीच्या अंधारातच नव्हे, 'तर दिवसाढवळ्याही शेकडो डंपर आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूची अवैध वाहतूक केली जात आहे. या अनिर्बंध उपशामुळे गिरणा नदीच्या पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे.
जोपर्यंत एखादा मोठा वाद किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही, तोपर्यंत पोलिस आणि महसूल प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
दापोऱ्यातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्क पोलिसांच्या डोळ्यादेखत वाळूने भरलेले डंपर पळून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
आता खेडी, वडनगरी आणि फुपनगरी यासारख्या गावांमध्ये भरदिवसा वाळूची लूट सुरू असतानाही कारवाईचा बडगा का उगारला जात नाही? प्रशासनाचे या माफियांना अभय आहे का? असा संतप्त सवाल जळगावकर उपस्थित करत आहेत.