पुणे 'क्राईम कॅपिटल' बनत चालले; वाढत्या गुन्हेगारीसाठी पोलीस आयुक्त जबाबदार, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा सुप्रिया सुळे
'शिक्षणाचे माहेरघर' म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. पुणे शहर आता वेगाने'क्राईम कॅपिटल' (गुन्हेगारीची राजधानी)बनत चालले आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शहरातील या बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेला थेट पुण्याचे पोलीस आयुक्त जबाबदार असून, गृहविभागाने त्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पुणे शहर आणि परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना तसेच नुकत्याच घडलेल्या विषारी दारूकांडामुळे झालेल्या नागरिकांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना ही आक्रमक भूमिका मांडली.