logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

कास तलाव दुर्घटना : बेपत्ता संग्राम भंडारे यांचा मृतदेह अखेर सापडला छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांना यश; ७० ते ८० फूट खोल प

कास तलाव दुर्घटना : बेपत्ता संग्राम भंडारे यांचा मृतदेह अखेर सापडला
छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांना यश; ७० ते ८० फूट खोल पाण्यातून मृतदेह बाहेर

सातारा प्रतिनिधी शेखर जाधव

मेढा: - कास तलावात बुडून बेपत्ता झालेल्या सातारा शहरातील वनवासवाडी-अमरलक्ष्मी परिसरातील संग्राम हरिभाऊ भंडारे (वय ४५) यांचा मृतदेह अखेर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमने शोधून बाहेर काढला. सुमारे ७० ते ८० फूट खोल पाण्यात सुरू असलेल्या अत्यंत आव्हानात्मक शोधमोहीमेला अखेर यश मिळाल्याने प्रशासनासह नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
रविवारी सायंकाळी संग्राम भंडारे हे आपल्या दोन मित्रांसह कास परिसरात फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर तिघेही कास तलाव परिसरात थांबले. त्यावेळी त्यांनी मद्यपान केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर दोघे तलावात पोहण्यासाठी उतरले, तर एक मित्र किनाऱ्यावर थांबला होता. पोहत असताना संग्राम भंडारे यांना अचानक दम लागल्याने ते पाण्यात बुडाल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले.
घटनेनंतर तातडीने शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र तलावाची मोठी खोली, गढूळ पाणी आणि कमी दृश्यमानता यामुळे रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नव्हता. घटनेची माहिती मिळताच छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.
सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आलेल्या शोधकार्यात रेस्क्यू टीमने विशेष उपकरणे आणि अनुभवी डायव्हर्सच्या मदतीने तलावाच्या तळाशी शोध घेतला. अखेर सुमारे ७० ते ८० फूट खोल पाण्यात संग्राम भंडारे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
या मोहिमेत चंद्रसेन पवार, ऋषिकेश रंकाळे, अथर्व बिडकर आणि अभिषेक शेलार यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अनेक तास सलग सुरू असलेल्या या शोधमोहीमेत त्यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. त्यांच्या धाडसी आणि समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळेच मृतदेहाचा शोध लागणे शक्य झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
दरम्यान, कास बोट क्लबचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनानेही शोधकार्यात सक्रिय सहभाग घेतला. मेढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार भिसे करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे सातारा शहरासह वनवासवाडी-अमरलक्ष्मी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच मद्यप्राशन करून जलाशयात उतरणे किती धोकादायक ठरू शकते, याची पुन्हा एकदा जाणीव या दुर्घटनेतून झाली आहे.
कास तलावातील ही शोधमोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, संकटसमयी दाखवलेल्या धाडसाबद्दल नागरिकांनी टीम सदस्यांना सलाम केला आहे. "सेवेसाठी सदैव तत्पर" हे ब्रीद पुन्हा एकदा या मोहिमेतून सार्थ ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

0
0 views

Comment