सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीसाठी कृषी विभागाची व्यापक मोहीम; १ लाख २४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सातारा, प्रतिनिधी : खरीप हं
सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीसाठी कृषी विभागाची व्यापक मोहीम; १ लाख २४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन
सातारा, प्रतिनिधी : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान, विविध योजना व आधुनिक शेतीविषयक माहिती पोहोचविण्यासाठी सातारा जिल्ह्यात कृषी विभागामार्फत व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यात गावपातळीवर व क्षेत्रीय स्तरावर मोहीम स्वरूपातील विविध कार्यक्रम, शिवार फेऱ्या, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येत आहेत.
सन २०२६ मध्ये प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीमुळे भारतीय मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची, म्हणजेच कमी पाऊस व उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान अंदाजातून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर ‘शिवार फेरी’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमांमध्ये कमी पाण्यावर येणाऱ्या व लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांची निवड, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, दशपर्णी अर्क, गांडूळ खत, कंपोस्ट खत, हिरवळीची खते यांचा वापर, मृदा ओलावा संवर्धन, बीबीएफ तंत्र, आंतरमशागत, कीड व रोग नियंत्रण, पशुधन संरक्षण, योग्य पेरणीची वेळ, आंतरपीक पद्धती आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ग्रामस्तर व तालुका स्तरावर खरीप हंगामपूर्व सभांचे आयोजन करून शेतकऱ्यांना शेती नियोजन व कृषी विभागाच्या विविध मोहिमांची माहिती देण्यात आली. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात सुमारे २५ कृषी विषयक मोहीम कार्यक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत ७ हजार ६०७ कार्यक्रमांच्या माध्यमातून तब्बल १ लाख २४ हजार ६४७ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या मोहिमांमध्ये एल निनो जनजागृती, बीज प्रक्रिया, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी, हुमणी कीड व्यवस्थापन, माती परीक्षण, जमीन आरोग्य पत्रिका वाटप, कृषी निविष्ठांचा संतुलित वापर, जैविक व सेंद्रिय शेती, कृषी आधारित व्यवसाय उभारणी, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, भात यांत्रिकीकरण, डिजिटल शेतीशाळा आदी उपक्रमांचा समावेश आहे.
खरीप हंगामात माती परीक्षणाचे महत्त्व, संतुलित खत व्यवस्थापन, बियाण्यांची उगवण क्षमता, प्रमुख पिकांचे लागवड तंत्रज्ञान, कृषी यांत्रिकीकरण, महाडीबीटी प्रणालीवरील अर्ज, तसेच कीटकनाशके व रासायनिक औषधांचा संतुलित वापर याबाबतही व्यापक प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. विशेषतः उसाच्या क्षेत्रात आढळणाऱ्या हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळे व एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींची प्रात्यक्षिके घेतली जात आहेत.
दरम्यान, खरीप व रबी हंगामातील पिक स्पर्धांमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवावे, यासाठीही कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी विषयक माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जिल्हा कृषी विभागाने व्हॉट्सअॅप चॅनल सुरू केले असून गावोगावी QR कोडच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.
कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या या मोहिमा पुढील कालावधीतही सुरू राहणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
– संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, सातारा