logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तहानलेले निरागस डोळे, पाण्यासाठी व्याकुळ, मुरबाड मधील मतिमंद मुलांच्या विद्यार्थ्यांवर पाणी संकट

शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी

राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असताना सर्वसामान्य नागरिकही उष्णतेने त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत मुरबाड तालुक्यातील एका मतिमंद निवासी विद्यालयातील २५ विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. मार्च महिन्यापासून विद्यालयाची बोअरवेल कोरडी पडल्याने संस्थेवर टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. मात्र, देणगी आणि सामाजिक मदतीवर चालणाऱ्या या संस्थेसाठी दररोजचा टँकर खर्च पेलणे कठीण बनले आहे.

मुरबाड तालुक्यातील माळ गावात अवनि मतिमंद मुलांचे निवासी विद्यालय कार्यरत आहे. आदिवासी आणि दुर्गम भागातील विशेष मुलांचे संगोपन, शिक्षण आणि निवासाची जबाबदारी ही संस्था गेल्या वीस वर्षांपासून सांभाळत आहे. १४ ते ५४ वयोगटातील २५ विद्यार्थी येथे वास्तव्यास असून, अनेक मुलांना स्वतःची तहान, वेदना किंवा अस्वस्थता व्यक्त करणेही शक्य नाही. वाढत्या उष्णतेमध्ये पाण्याअभावी या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. विद्यालय परिसरातील बोअरवेल १५ मार्चपासून पूर्णपणे आटली आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वयंपाक, आंघोळ, कपडे धुणे आणि स्वच्छतेसाठी दररोज टँकर मागवावा लागत आहे. एका टँकरसाठी सुमारे १५०० रुपयांचा खर्च येत असून, संस्थेच्या मर्यादित आर्थिक साधनांवर हा अतिरिक्त भार पडत आहे.

आतापर्यंत १० ते १२ सामाजिक संस्थांनी टँकरसाठी मदत केली आहे. मात्र, ही मदत तात्पुरती असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. विशेष मुलांच्या निवासी विद्यालयात स्वच्छता आणि पाण्याचे महत्त्व अधिक असते. अनेक विद्यार्थ्यांना स्वतःची वैयक्तिक स्वच्छता राखण्यासाठी मदतीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यास डीहायड्रेशन आणि आरोग्याच्या इतर समस्या उद्भवण्याची भीती संस्थेकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संस्थेने ग्रामसेवक तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. याबाबत व्यवस्थापक यांना विचारले असता मार्च महिन्यापासून बोअरचे पाणी पूर्णपणे आटले आहे. पिण्याचे पाणी, आंघोळ, कपडे धुणे तसेच स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाणी उपलब्ध नसल्यास मुलांना डीहायड्रेशनसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो अशी प्रतिक्रिया दिली ऋषिकेश इरकशेट्टी, व्यवस्थापक

5
305 views

Comment